सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या विविध सेवाभावी उपक्रमाने लौकिक प्राप्त बनलेल्या व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सावंतवाडी भेटीच्या निमित्ताने निर्माण झालेल्या समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीने रविवारी २३ मार्च २०२५ रोजी एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला मोठ्या संख्येने चळवळीतील विचारशील व कृतीशील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, सामाजिक चळवळीमध्ये महापुरुषांच्या विचारांच्या प्रचार व प्रसाराचे काम प्रशिक्षित व दक्ष कार्यकर्तेच प्रामाणिकपणे करू शकतात, असे कार्यकर्ते विचारांच्या दृष्टीने पक्के असतात. चळवळीमध्ये वैचारिक व तात्विक मार्गदर्शन करणाऱ्यांची नेहमीच गरज भासत असते. ही गरज काही प्रमाणात प्रशिक्षण शिबिरातून पूर्ण होऊ शकते, हे ओळखून सदर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला मार्गदर्शक म्हणून फुले- शाहू- आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत तथा सेक्युलर मुव्हमेंट महाराष्ट्र राज्य अध्यक्ष व प्रसिद्ध साहित्यिक प्रा. गौतमीपुत्र कांबळे मार्गदर्शन करणार आहेत. तर सन्माननिय उपस्थिती म्हणून सेक्युलर मुव्हमेंट चळवळीचे कार्याध्यक्ष भरत शेळके हे उपस्थित राहणार आहेत. सदर प्रशिक्षण कार्यक्रम येथील कळसुलकर हायस्कूलमध्ये रविवार, २३ मार्च रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत होणार असून फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील बुद्धिजीवी, विद्यार्थी, युवक, युवती व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन प्रेरणाभूमीचे सचिव तथा निमंत्रक मोहन जाधव व मान्यवरांनी केले आहे.
ADVT –




.


