मुंबई : यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार, खान्देश भूषण,पद्मश्री, पदमभूषण राम सुतार यांना जाहीर झाला आहे. धुळे तालुक्यातील गोंदूर गावाचे सुपुत्र असलेल्या सन्माननीय राम सुतार यांनी अयोध्येत भगवान श्रीरामाची २१५ फूट उंच मूर्ती, सरदार सरोवर येथील ५५० फूट उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, दिल्लीतील राजीव गांधी यांचे योगदान सांगणारे भित्तिशिल्प, संसद भवनाच्या आवारातील अनेक पुतळे त्याचप्रमाणे देशभरातील प्रत्येक राज्यात त्यांनी आपल्या शिल्पकलेचा साक्षात्कार घडविला आहे.

त्यांच्या स्टुडिओत घडलेले महात्मा गांधीचे ३५० अर्धपुतळे भारत सरकारने १७० देशांना भेट म्हणून दिलेले आहेत. खान्देशी शिल्पकार या निमित्ताने महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित होत आहेत हे सर्व खान्देशवासीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. वयाच्या शंभराव्या वर्षी असा पुरस्कार प्राप्त करणारे ते कदाचित एकमेव मराठी व्यक्ती आहेत.


