नवी दिल्ली : ईदपूर्वी भारतीय जनता पक्षाने गरीब मुस्लिमांना भेटवस्तू वाटण्याची मोहीम सुरू केली आहे. अल्पसंख्याक ‘सौगत-ए-मोदी’ अभियान राबवून भाजप ३२ लाख गरीब मुस्लिमांना भेटवस्तू देणार आहे. मंगळवारी दिल्लीतील निजामुद्दीन येथून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या मोहिमेवर देखरेख ठेवणार आहेत. गरीब मुस्लिमांना अभिमानाने ईद साजरी करता यावी यासाठी त्यांना एक किट ही भेट देण्यात येणार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
भाजपच्या ३२ हजार कार्यकर्त्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता मशिदीची जबाबदारी घेईल. अशा प्रकारे देशभरातील ३२ हजार मशिदींचा समावेश करण्यात येणार आहे. यानंतर गरीब मुस्लिमांना ईदपूर्वी भेटवस्तू दिल्या जातील. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी म्हणाले की, ईद, भारतीय नववर्ष, नौरोज, ईस्टर, गुड फ्रायडे च्या पार्श्वभूमीवर भाजप ही मोहीम राबवत आहे.
ते म्हणाले की, असे अनेक अल्पसंख्याक आहेत जे आपले सण व्यवस्थित साजरे करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत भाजप त्यांच्यासमोर ‘सौगत-ए-मोदी’ सादर करणार आहे. याशिवाय जिल्हास्तरावर ईद मिलन कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी यासिर जिलानी म्हणाले की, मुस्लिम समुदायासाठी च्या योजनांना प्रोत्साहन देण्यासाठी ही मोहीम चालविली जाऊ शकते जेणेकरून एनडीएला ही राजकीय पाठिंबा मिळेल.
‘सौगात-ए-मोदी’ किटमध्ये काय-काय असणार ?
रमजानच्या पवित्र महिन्यात ईदपूर्वी भाजपचा हा प्रचार अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपला ३२ लाख मुस्लीम कुटुंबांपर्यंत पोहोचायचे आहे. सौगत-ए-मोदी किटमध्ये कपडे, शेवया, खजूर, शेंगदाणे, मिठाई आणि साखर असेल. याशिवाय महिलांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये सूट क्लॉथ आणि पुरुषांच्या किटमध्ये कुर्ता पायजमा कापड असेल. मिळालेल्या माहितीनुसार, एका किटची किंमत ५०० ते ६०० रुपये असेल.


