सावंतवाडी : आमच्या कोकणातील शेतकरी स्वाभिमानी आहे. तो इतर भागांतील लोकांसारखा शासनाची फसवणूक करीत नाही. तो प्रचंड मेहनतीने पीके घेतो. अशा वेळी ई – पीक नोंदणीची आयत्यावेळी सक्ती न करता मागील वर्षांचे पिकांचे रेकॉर्ड लक्षात घेऊन सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट विमा योजनेचा लाभ मिळावा. कोणीही या लाभापासून वंचित राहता कामा नये, असा अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने माहीमचे आमदार महेश सावंत यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, शहर प्रमुख शब्बीर मणियार यांसह तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शेतकरी घाम गाळतो. मात्र अधिकारी वर्ग हा आपल्या केबिनमध्ये एसीच्या गार वारा खाऊन पंचनामे करत असतो. तसेच आयत्यावेळी ई-पीक नोंदणी सक्तीची केली जाते आणि तसा शासनस्तरावरून अध्यादेश काढला जातो. मात्र आताच्या परिस्थितीत शेतकरी हा शेतावर किंवा बागायतीत काम करत असल्यामुळे तो तुमच्या कार्यालयात येणार कसा?, त्याला या तांत्रिक गोष्टींची पूर्तता करणे शक्य होणार नाही. म्हणून या नोंदणीसाठी नेमणूक दिलेला कालावधी हा अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. आमच्या कोकणातील एकही शेतकरी आजपर्यंत कधीही आत्महत्या करत नाही कारण तो अत्यानात प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे. असेल नसेल परिस्थितीत तो समाधान मानून जीवन जगतो. अशावेळी विमा कंपन्या आणि शासनस्तरावरून देखील त्याची जर अवहेलना होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाहीत. विमा कंपनी या स्वतःच्या आणि त्यांच्या संलग्न असलेल्या बँकांच्या आर्थिक लाभासाठी शेतकऱ्यांची अवहेलना करतात, असे होता कामा नाही. त्यामुळे मागील दोन तीन वर्षांच्या कागदपत्रांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचे सकारात्मक रिपोर्ट सादर करून सरसकट त्यांना विमा चा लाभ देण्यात यावा. एकही शेतकरी यापासून वंचित ठेवता कामा नाही, अशी मागणी माहीमचे शिवसेनेचे आमदार महेश सावंत, रुपेश राऊळ, बाबुराव धुरी, मायकल डिसोजा यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी रमेश गावकर, गुणाजी गावडे, सोनू दळवी, निशिकांत पडते, शैलेश गौडाळकर, सोनू कासार, बाळा बोभाटा, अशोक धुरी, रियाज खान, सानिरा खलील, संदीप गवस, प्रकाश ठिकार, संदीप माळकर, आबा केरकर, निशिकांत तोरस्कर, बाळू परब, अथर्व सावंत, अभिजीत कोटेकर, यांसह अनेक शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.
दरम्यान पुढील दोन-तीन दिवसात योग्य तो सकारात्मक रिपोर्ट विमा कंपन्यांना सादर केला जाईल व शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी योग्य ती काळजी घेतली जाईल, असे आवाहनही श्रीधर पाटील यांनी उपस्थित शिवसैनिक व शेतकर्यांना दिले.
दरम्यान यावेळी ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी सीताराम गावडे यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली व कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकारी घामाघूम झाल्याचे पाहावयास मिळाले.
ADVT –


