सावंतवाडी : शाळा ही आपली दुसरी माताच आहे. या मातेप्रति कृतज्ञता भाव नित्य आपल्या मनात असला पाहिजे. हा भाव मनात असला की स्वतःच्या उत्कर्षाबरोबरच शाळेच्या प्रगतीची ओढही आपल्याला लागते. याच ओढीने आपली पावले शाळेकडे धाव घेतात आणि हात दातृत्वाने शाळेच्या विकासाला गती देतात. असे प्रतिपादन श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळवडेचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांनी केले.
श्री. देसाई हे तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सन २००४-२००५ या सालातील इयत्ता दहावीच्या वर्गाच्या स्नेहमेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका श्रीमती विदुल पाटकर, निवृत्त शिक्षिका सौ. रंजना सावंत, ज्येष्ठ शिक्षिका सौ मीरा नाईक, सौ मिलन देसाई, शिक्षक किशोर नांदिवडेकर, प्रयोगशाळा सहाय्यक नंदकिशोर बुगडे, लिपिक आनंद मौर्ये, निवृत्त लिपिक रामा मसुरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती पाटकर यांच्या व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले
यावेळी बोलताना श्रीमती पाटकर म्हणाल्या शाळा ही आपल्याला घडवते. चांगले मार्गदर्शन करते. सत्य असत्य ओळखायला शिकवते. फसव्या जगापासून सावध राहायला शिकवते. तुमची पिढी ही आदर्शवत पिढी आहे. ज्ञानाची परतफेड तुम्ही कृतज्ञतायुक्त भावनेने करत आहात. गाव, गावाची माती, शाळा, शिक्षक यांचा कधीही विसर पडू देऊ नका. या सर्वांना तुम्ही नित्य स्मरणात ठेवले तर आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल.
यावेळी मुख्याध्यापक प्रतापराव देसाई. माजी मुख्याध्यापिका श्रीमती विदुल पाटकर, निवृत्त शिक्षिका सौ. रंजना सावंत, ज्येष्ठ शिक्षिका सौ. मीरा नाईक, सौ मिलन देसाई, शिक्षक किशोर नांदिवडेकर, प्रयोगशाळा सहाय्यक नंदकिशोर बुगडे, परिचर सिताराम कोळेकर, लिपिक आनंद मौर्ये, निवृत्त लिपिक रामा मसुरकर, चतुर्थश्रेणी कर्मचारी सत्यवान परब, केशव परब तसेच माजी विद्यार्थी विशाल होडावडेकर, दिलीप कोरगावकर, तृप्ती तिरोडकर नारायण नाईक, सागर सावळ आदी मान्यवरांचा शाल, श्रीफळ, गुलाब पुष्प व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
विशाल होडावडेकर यांनी आपल्या दातृत्वातून विद्यालयाला नामफलक व फलकासाठी छप्पर बनवून दिले. याबद्दल त्यांचा विद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक प्रतापराव देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी शिक्षिका सौ. सावंत, सौ. नाईक, शिक्षक श्री. नांदिवडेकर, श्री बुगडे यांनी व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश माजगावकर यांनी केले.


