शिरोडा : सुप्रसिद्ध साहित्यिक कै. जयवंत दळवी जन्मशताब्दी प्रीत्यर्थ आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या खुल्या साहित्य चर्चेत नुकतीच जयवंत दळवी यांच्या ‘निवडक ठणठणपाळ’ या पुस्तकावर चर्चा करण्यात आली.
साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत कवी श्री.विनय सौदागर यांनी या पुस्तकाविषयी तांत्रिक माहिती देऊन ‘ठणठणपाळ’ या सदराच्या जन्माची कथा सांगितली.प्रारंभी नामवंत प्रकाशक गं.प.परचुरे यांच्या ‘परचुरे’ मासिकात मो.ग.रांगणेकर ‘घटका गेली,पळे गेली’ हे सदर लिहीत असत.परंतु या सदरातील टीका अनेक साहित्यिकांना झोंबू लागली.त्यामुळे हे सदर परचुरे यांना बंद करावं लागलं.नंतर पुरुषोत्तम धाक्रस ‘परचुरे’ मासिकाचे संपादक झाल्यावर त्यांनी जयवंत दळवी यांना हे सदर परत सुरू करण्याची विनंती केली.पुढे मॅजेस्टिक प्रकाशनाच्या ‘ललित’ मासिकातून हे सदर सुरू झाले आणि लोकप्रिय झाले,असे सौदागर यांनी या वेळी बोलताना सांगितले.’ठणठणपाळ’ हे जयवंत दळवी आहेत हे लोकांना कसे कळले याचा किस्साही त्यांनी यावेळी सांगितला.पुस्तकामधील निवडक तथा रोचक भागाचे वाचनही यावेळी सौदागर यांनी केले.
तद्नंतर झालेल्या चर्चेत सचिन दळवी,मंगेश नाडकर्णी,दीपक करंडे,सचिन गावडे,नीलम कांबळे,एकनाथ शेटकर,सरोज रेडकर,जयदीप देशपांडे,विनय फाटक,डॉ.गणेश मर्ढेकर,अविनाश जोशी,सोमा गावडे,प्राची पालयेकर,अनिष्का रगजी,कादंबरी म्हस्के,सुधा साळगावकर यांनी भाग घेतला.
गजानन मांद्रेकर यांनी सुप्रसिद्ध ललित लेखक कै.रवींद्र पिंगे यांच्या ‘देवघरचा पाऊस ‘ या पुस्तकातील ‘सदाप्रसन्न जयवंत दळवी’ या लेखाचे वाचन केले.
खुल्या साहित्य चर्चेतील सव्विसाव्या पुस्तकावरील या चर्चेच्या प्रारंभी विनय सौदागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.शेवटी त्यांनीच ऋणनिर्देश केला.
दरम्यान,खटखटे ग्रंथालयाचा आणि साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सदस्य मिहीर नाईक याचे दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल खटखटे ग्रंथालयाचे कार्याध्यक्ष सचिन गावडे व कार्यवाह सचिन दळवी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.


