कणकवली : आज ३१ मे जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती दिनानिमित्ताने सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जि. प. समाजकल्याण विभाग नशामुक्त भारत अभियान, डॉ. अनिल नेरुरकर. (एम. डी.,अमेरिका.) प्रेरित प्रज्ञांगण तळेरे, श्रावणी कंप्युटर एज्युकेशन यांच्या संयुक्तपणे तळेरे येथे विद्यार्थ्यांसाठी तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी युवा वर्गाने व्यसनमुक्त राहुन महामानवांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून व्यसनांच्या फसव्या जाहिरातींच्या जाळ्यात न अडकता जीवनाची वाटचाल करावी, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच जिल्हा समिती अध्यक्ष श्रावणी मदभावे यांनी विद्यार्थ्यांना पोस्टर आणि स्लाईड शोच्या माध्यमातून तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत माहिती दिली. यावेळी प्रज्ञांगण तळेरेचे श्री. सतीश मदभावे, प्रा. प्रशांत हटकर, तळेरे सरपंच श्री हनुमंत तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वांना तंबाखू मुक्तीची शपथ देऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.


