मालवण : राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा काल दिनांक 26 ऑगस्ट 2024 ला कोसळला. आठ महिन्यांपूर्वी उभारलेला महाराजांचा पुतळा कोसळताना पाहून 350 वर्षे समुद्रात उभ्या असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याला काय वाटलं असेल?
किती वेदना झाल्या असतील???
हे शिवलंके !
महाराज महाराज
मोठा घात झाला,
तुमचा भव्य पुतळा
माझ्या डोळ्यादेखत
भुईसपाट झाला.
दृढ शिवलंका
ढसा-ढसा रडत होती,
नि टेहाळणी बुरुजावरूनी
महाराजांची नजर
राजकोटवर फिरत होती.
महाराज उद्गारले-हे शिवलंके!
कशासाठी तू अश्रू ढाळतेस
ज्यांची योग्यता नाही,
त्यांच्याकडून दर्जाची अपेक्षा
कशी काय तू बाळगतेस?
पुतळ्यांची हौस असती तर
किल्ले कशाला बांधले असते?
रयतेचे हित बघितले नसते तर
स्वराज्यातही स्वार्थ नि भ्रष्टाचार
एकत्र बोकाळले असते.
हे शिवलंके! शतकानुशतके तू
किंचितही ढळू नकोस,
ऊन वारा पाऊस लाटांमध्ये
स्वराज्याची ओळख तू
कधीही मिटायला देवू नकोस.
मुखावरी समुद्री जल घेताच
शिवलंकेचे अश्रू धुवून गेले,
दृढनिश्चयी पुन्हा होताच,
ताठ मानेने बुरुज सारे
हर्षोल्हासित होऊनी गेले.
✍🏻 कमलेश गोसावी
काळसे, मालवण
मो. 9421237887
ADVT –



