वेंगुर्ले : तालुक्यातील रेडी – रेवस मार्गावर उभादांडा वरचेमाड ते मोचेमाड दरम्यान टाकण्यात आलेल्या भुमिगत विद्युत वाहिनीमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे . ठेकेदाराने सदर काम निकृष्ट पद्धतीत केल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे चरातील सर्व माती रस्त्यावर आली, त्यामुळे वाहतुकीस रस्ता बंद झाला . तसेच भुमिगत विद्युत वाहीनी टाकल्यावर सदरचे चर बोल्डर टाकुन बुजवीने आवश्यक असताना फक्त माती टाकुन थुकपट्टी करण्यात आलेली आहे . भुमिगत लाईन टाकताना रस्त्याच्या कडेला असलेले गटर हे बुजल्यामुळे डोंगर उतारावरुन येणारे पाणी त्या चरात जाऊन त्या चरातील माती वारंवार रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीस अडथळा येत आहे . तसेच चरातील माती वाहुन गेल्यामुळे ठिकठिकाणी विद्युत वाहीनी रस्त्यावर आली आहे . त्यामुळे कोणत्याही क्षणी धोका निर्माण होऊ शकतो.
सदर बाब गंभीर असतानासुद्धा ठेकेदार व महावितरण चे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळेच मोचेमाड ग्रामस्थ व भाजपा पदाधिकाऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच सदर गंभीर प्रश्नी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली.

तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सदर घटनेचे गांभीर्य समजावे यासाठी तातडीने या बाबतचा अहवाल सादर करावा , अशी मागणी केली . तसेच ठेकेदाराकडून सदर झालेले निकृष्ट काम दुरुस्त करून घेत सदर रस्ता वाहतुकीस योग्य करावा अशी आग्रही मागणी केली . तसेच दुरुस्तीचे काम लवकरात लवकर सुरु न केल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन महावितरण कार्यालया समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपा शिष्टमंडळाने दिला .
यावेळी मोचेमाड ग्रामस्थ सत्यवान पालव , मोहन कोचरेकर , राजाराम तांडेल , नारायण गावडे , उदय गावडे , भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष पपु परब , मा.तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , मच्छिमार नेते दादा केळुसकर , युवा मोर्चाचे प्रणव वायंगणकर व वैभव होडावडेकर , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा इत्यादी उपस्थित होते .


