सावंतवाडी : आताचे युग हे स्पर्धात्मक युग आहे. म्हणून विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यानी सहभाग घेऊन त्या दृष्टीने जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रचंड अभ्यास करावा, अशी माझी मनस्वी इच्छा आहे आणि हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन यावर्षीची वह्यां वाटप कार्यक्रमाची थीम देखील आम्ही देशातील ‘विविध महत्वाच्या स्पर्धा परीक्षा’ अशी ठेवलेली आहे. स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करणाऱ्या इच्छुक मुलांना देखील सहकार्य करण्यास मला आनंद होईल, असे भावनिक आवाहन भाजपा युवा नेते संदीप गावडे यांनी केले.

प्रतिवर्षी प्रमाणे संदीप गावडे यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम राबविण्यात येतो. यावर्षी देखील श्री. गावडे यांच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप उपक्रम राबवण्यात आला. यंदाचे वर्ष हे या उपक्रमाचे ८ वे वर्ष आहे. आज संपूर्ण आंबोली जिल्हापरिषद मतदारसंघात हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होणे फार महत्वाचे आहे, हाच उद्देश समोर ठेऊन मोफत वह्या वाटप उपक्रम दरवर्षी आम्ही राबवित असतो. यावेळी आंबोली जिल्हापरिषद मतदार संघातील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सरपंच उपस्थित होते.


