वेंगुर्ला : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ॲड. दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज वेंगुर्ला येथे रक्तदान, देहदान व अवयवदानाबाबत सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेची कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी प्रमुख वक्ते सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी मार्गदर्शन केले.

रक्तदान केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊन, कॅलरीज बर्न होतात. रक्तदान करताना सामाजिक सुसंवाद साधला जातो. ज्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून आतापर्यंत गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र मधील हजारो रुग्णांना रक्तदान करुन प्राण वाचवले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही एकमेव संस्था आहे की,ज्याने मित्रसस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० हून अधिक रक्तदान शिबीरे, अवयवदान व देहदान प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच दुर्मिळ अशा बॉम्बे ब्लड ग्रुपबाबत माहिती देताना या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० लोकांचा शोध घेतला आहे, असे प्रतिपादन सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांनी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या लोकनेते ऍड.दत्ता पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, विद्यार्थी कल्याण विभाग, बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमालेच्या वेळी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलननाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. केळकर, प्रकाश तेंडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. सोनाली सावंत, बहि:शाल शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. संजीव लिंगवत, अखिल भारतीय बौद्ध समितीचे अध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर, सिंधु रक्तामित्र प्रतिष्ठानचे विभागीय अध्यक्ष तथा गोवा समन्वयक संजय पिळणकर, विभागीय संघटक यशवंत गावडे, डॉ. रवींद्र गरुड, गोवा समन्वयक ऍलिस्टर ब्रिटो आदी उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयातील शिक्षक वृंद व विद्यार्थी वर्गाने रक्तदान, अवयवदान व देहदान या विषयावर आधारित व्याख्यानात मोठ्या संख्येने उपस्थित राहून व संवाद साधून माहिती घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजीव लिंगवत यांनी, स्वागत डॉ. दिपाली देसाई यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. सतीश पाटील यांनी केले.
ADVT –


