पंढरपूर : अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर…, अशा जयघोषात पंढरपुरी नगरी दुमदुमली आहे. विठ्ठलनामाच्या गजरात आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत आज पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची महापूजा पार पडली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीची शासकीय महापूजा केली. राज्याची भरभराट व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.
षाढी एकादशीनिमित्त आज मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास पारंपरिक पूजा संपन्न झाली. या पूजेसाठी पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. यामुळे मंदिराचे पावित्र्य अधिकच खुलले होते.
या वर्षीच्या शासकीय पूजेचा मान सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील शेतकरी दाम्पत्य बाळासाहेब पाटील आणि श्रीमती शोभा पाटील यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पूजेदरम्यान विठ्ठलाच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आणलेला खास पोशाख विठ्ठलाला परिधान करण्यात आला. यानंतर विठ्ठलाची आणि रुक्मिणी मातेची आरतीही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आली.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांची पूजा सुरू असतानाही सर्वसामान्य भाविकांसाठी मुखदर्शनाची रांग सुरु होती. त्यासोबतच व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद करण्यात आले. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला.
राज्यभरातून सुमारे १८ ते २० लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. वारकरी परंपरेत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंगाला पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करताना दरवेळी एक नवीन ऊर्जा मिळते. ही आपली संस्कृतीच अलौकिक आहे. विठ्ठल-रखुमाई हे आपले आराध्य दैवत आहे. सर्व वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी व सन्मार्गाने चालण्याची बुद्धी द्यावी तसेच बळीराजाला सुखी ठेवण्याची शक्तीही द्यावी अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाकडे केली.


