सावंतवाडी : ‘एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी,पुणे’ आणि ‘एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’ अंतर्गत स्थापित ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’च्या वतीने 19 जुलै ते 20 जुलै 2025 या दोन दिवशीय कालावधीत श्रीक्षेत्र आळंदी येथे ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद’ आयोजित करण्यात आली आहे.

वारकरी परिषदेचे उदघाटक व प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सामाजिक उपक्रम विभागाचे मंत्री, ज्येष्ठ नेते आशिष शेलार यांना मुंबईत त्यांच्या निवासस्थानी निमंत्रण देण्यात आले. यावेळी त्यांनी लोककल्याणासाठी वारकरी कीर्तनकार आणि सरपंच यांना एका व्यासपीठावर आणणारा अभिनव व स्तुत्य उपक्रम असल्याचे उद्गार काढले.

‘राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक श्री. योगेश पाटील व सहसमन्वयक श्री. प्रकाशराव महाले यांनी श्री.आशिष शेलार यांना हे निमंत्रण मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी दिले. निमंत्रण आनंदाने स्वीकारुन कार्यक्रमासाठी अगत्याने उपस्थित राहण्याचे त्यांनी मान्य केले. ‘एमआयटी, पुणे’ शिक्षणसंस्थासमूहाचे कार्याध्यक्ष श्री. राहुल कराड यांच्या विचारचिंतनातून ही उपक्रम संकल्पना साकारली आहे. त्यांचे स्वीय सहाय्यक श्री. कृष्णाजी गाडे हे यावेळी समवेत होते. महाराष्ट्र राज्यातील प्रमुख 50 कीर्तनकार आणि ‘राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख 100 पदाधिकारी व संलग्न सरपंच यांना या ‘महाराष्ट्र वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषदे’साठी निमंत्रित करण्यात आले आहे.
दरम्यान या परिषदेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राष्ट्रीय सरपंच परिषदेचे कोकण विभागाचे अध्यक्ष संतोष राणे, नाशिक व कोकण विभागाचे प्रांत अध्यक्ष ॲड. नकुल पार्सेकर, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रा. रूपेश पाटील उपस्थित राहणार आहेत.


