सावंतवाडी : तालुक्यातील धाकोरे येथील परिवर्तन महिला शेतकरी संघाच्या वतीने धाकोरा येथे रानभाजी महोत्सव तसेच रानभाजी पाककला स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडळ कृषी अधिकारी सावंतवाडी प्रकाश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी रानभाजी व औषधी वनस्पती तज्ज्ञ रामचंद्र शृंगारे, सावंतवाडी उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे तसेच परिवर्तन संघाच्या अध्यक्षा सौ. मनीषा गोवेकर, सचिव शुभदा गोवेकर, खजिनदार पूजा कोठावळे, उपाध्यक्षा जयवंती गोवेकर तसेच सदस्य रूपाली मुळीक, संध्या मुळीक, प्रेरणा गवस, स्वप्नाली पालेकर, बबीता गोवेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित स्पर्धकांनी धाकोरा परिसरात मिळणाऱ्या परंतु लुप्त होत जाणाऱ्या अशा पावसाळी हंगामात मिळणाऱ्या भाज्या यात फागले, कुड्याच्या शेंगा, तसेच एक पानाची भाजी, अळू ,फोडशी , कुरडू,चुरण पाला यांसारख्या नैसर्गिक रीत्या उगवणाऱ्या परंतु पोषण मूल्याने परिपूर्ण असलेल्या भाज्यांपासून वेगवेगळे पाककृती सादर केल्या. सदर पाककृतींचे परीक्षण हे श्री रामचंद्र शृंगारे व श्री प्रकाश पाटील , श्री यशवंत गव्हाणे यांनी केले .
यात अनुक्रमे ममता मनोहर साठेलकर,अक्षरा अनिल नाईक व पूजा हरेश कोठावळे यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तसेच उत्तेजनार्थ संध्या राजाराम मुळीक व प्रेरणा प्रकाश गवस यांना मिळाला. यशस्वी स्पर्धकांचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
सदर कार्यक्रमाच्या वेळी वनस्पती तज्द्या रामचंद्र शृंगारे यांनी महिलांना परिसरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींचे आपल्या आहारातील महत्त्व विशद केले .तसेच महिलांनीही धाकोरा पंचक्रोशी परिसरातील औषधी वनस्पतीची माहिती रामचंद्र शृंगारे यांच्या कडून घेतली. यावेळी मंडळ कृषी अधिकारी सावंतवाडी प्रकाश पाटील यांनी कृषी विभागाच्या अनेक योजनांची माहिती देत महिलांनी त्याचा लाभ घ्यावा व स्वतःचा व संघाचा आर्थिक विकास साधावा, असे आवाहन केले.
उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे यांनी धाकोरा परिसरामध्ये सर्वोत्तम दर्जाच्या आंबा काजू नारळ रतांबे आहेत . त्यापासून महिलांनी सांघिक पद्धतीने वेगवेगळी युनिट बनवून प्रोडक्शन तयार करावे व मार्केटिंग करावे त्यासाठी कृषी विभाग सावंतवाडी कडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले .
सर्व मान्यवरांनी संघास भविष्यातील उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी संघाच्या अध्यक्षा सौ.मनीषा गोवेकर यांनी आपला धाकोरा गाव हा नैसर्गिक साधनसामुग्रीने युक्त आहे व ते नैसर्गिकपणात टिकून ठेवण्यासाठी संघ नेहमीच कटीबद्ध राहील, निसर्गाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक आर्थिक उत्पादन करणाऱ्या महिलांच्या मागे संघ नेहमीच उभा राहील, संघाच्या माध्यमातून धाकोरे व पंचक्रोशीतील महिलांसाठी कलम बांधणी प्रशिक्षण देणे किंवा रान भाजी संबंधित माहिती देणे , वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवून मॅंगो फुड प्रोडक्शन द्वारे त्याची विक्री करणे यासारखे उपक्रम गेल्या तीन वर्षात चालू असल्याचे सांगितले. त्याचा फायदा संघातील महिलां घेत आहेत. यापुढेही यासारखे अनेक उपक्रम संघाद्वारे राबवून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे असे सांगितले. या वेळी संघाच्या खजिनदार पूजा कोठावळे यांनी सर्व महिलांनी संघाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले . गेल्यावर्षी आयोजित केलेल्याbकलम बांधणी स्पर्धेत जास्तीत जास्त कलम बांधून ती वाढवल्याबद्दल रेखा माने यांचा विशेष सत्कार श्री यशवंत गव्हाणे उप कृषी अधिकारी सावंतवाडी यांनी केला.यावेळी संघाच्या उपाध्यक्ष सौ जयवंती गोवेकर तसेच संघाच्या सचिव सौ शुभदा गोवेकर यांनी उपस्थित मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन आभार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल धाकोरा गावचे ज्येष्ठ शेतकरी बाबुराव विठू गोवेकर यांचे विशेष आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी संघाच्या महिलांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली व सदरच्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.


