नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील लोकप्रिय नेते असल्याचे नव्याने प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे. जगात त्यांची लोकप्रियता वाढल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यातच आता भाजपच्या बड्या नेत्याने मोदींची तुलना थेट देवाशी केली आहे. पीएम नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे 11 वे अवतार असल्याचे वक्तव्य भाजप नेते राज पुरोहित यांनी केले आहे. हिंदू परंपरेनुसार, भगवान विष्णूचा दहावा अवतार अजून व्हायचा आहे. कल्की हा भगवान विष्णूंचा दहावा अवतार असेल, अशी मान्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान विष्णूचे 11 वे अवतार असल्याचा दावा राज पुरोहित यांनी केला आहे. पतंप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं उधळताना भाजप नेते राज पुरोहित देहभान हरवून बसले. मोदी हे न थकता काम करतात असे ते म्हणाले. कौतुक करताना पुरोहित भारावले. मग देवासोबत मोदींची तुलना करुन ते मोकळे झाले.
मोदी यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत त्यांनी ते कसं न थकता काम करतात, याचा उल्लेख केला. मोदी हे पोर्तुगाल येथे गेले. तेथून ते अमेरिकेला गेले. नंतर फिनलँडचा दौरा त्यांनी केला. लंडन येथे गेले. तिथून ते अहमदाबाद येथे आले. त्यांच्याकडे इतकी ऊर्जा आहे. किती ही कौतुक केले तरी ते कमीच असल्याचे ते म्हणाले.
मोदी ट्रम्प यांच्यावर नाराज?
तर यावेळी बोलताना राज पुरोहित यांनी एक गौप्यस्फोट केला. गेल्या तीन महिन्यांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करत आहेत. पण मोदींनी त्यांचा एकही फोन उचलला नसल्याचा दावा पुरोहित यांनी केला. तर मोदींनी अद्याप ट्रम्प यांना कोणताही फोन केला नसल्याचे ते म्हणाले. भारत-पाक युद्ध बंदीचे क्रेडिट घेण्याचा प्रयत्न ट्रम्प हे वारंवार घेत आहेत. 10 मे 2025 रोजी त्यांनी संघर्ष सुरु असतानाच भारत आणि पाक हे दोन्ही देश नियंत्रण रेषेवर शांततेसाठी राजी झाल्याचे ट्वीट ट्रम्प यांनी दुपारीच केले होते. त्यानंतर सायंकाळी दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. पण दोन्ही देशांनी ट्रम्प यांची मध्यस्थी केल्याचा दावा फेटाळला आहे.


