सावंतवाडी : गोविंद गावडे यांनी ‘आशिया पॅसिफिक ग्लोबल रेकॉर्ड’ यात सातत्याने आठ तास 25 मिनिटे शिवतांडव स्तोत्रावर तबलावादन करून एक नवा विक्रम रचला आहे. आमच्या सह्याद्री पट्ट्यातील आंबोली गावाचा हा सुपुत्र असल्यामुळे साहजिकच आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असून त्यामुळे आंबोली आणि पंचक्रोशीचे नाव जगभरात पोहोचले आहे. गोविंद गावडे यांच्या पुढील प्रवासासाठी जे जे सहकार्य लागेल, ते नक्कीच करू, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी व्यक्त करून गोविंदला पुढील स्पर्धेसाठी आणि नव्या विक्रमासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.
आंबोलीतील गडदूवाडी येथील रहिवासी असलेला गोविंद सध्या कोल्हापूरमध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील, बाबूराव गावडे, कोल्हापूरमधील मेनन अँड मेनन कंपनीत नोकरी करतात. गोविंदच्या या यशामागे त्याचे आई-वडील आणि डॉ. कदम यांचे मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे.
कोल्हापूरमधील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनेही त्याला मोठा पाठिंबा दिला. श्रावण सोमवारी गोविंदने कोणताही ताण न घेता हसत-खेळत हे तबला वादन केले. सुरुवातीला ८ तासांची वेळ निश्चित केली होती, पण त्याच्या तयारीमुळे तो आणखी काही काळ वादन करू शकला असता.
गोविंदच्या या विक्रमाने भारतीय संगीत क्षेत्राला एक नवी ओळख दिली आहे. सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याचे समाधान सर्वांना आहे.


