Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

आज ‘जागतिक वडापाव दिन!’ – त्यानिमित्ताने प्रा. रूपेश पाटील यांचा विशेष लेख.

 

(फोटो – सावंतवाडी येथे वडा तयार करताना नारायण शेटकर. – ‘संजूचा वडापाव’)

 आज 23 ऑगस्ट, जागतिक वडापाव दिन…!
वाचक मित्रहो, आज ‘जागतिक वडापाव दिन ‘म्हणजे असाही दिवस असतो का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर ‘हो’ असे आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही म्हणजे वडापाव.

जगभरामध्ये बॉम्बे बर्गर म्हणूनही वडापाव ओळखला जातो. आज जगभरामध्ये वडापाव पोहचला आहे. मात्र मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही हेही खरंच. मात्र या वडापावचा जन्म नक्की कुठे झाला. तो आजच्या मॅक-डोनाल्ड्सपासून ते शेजवान वडापाव, स्वीटकॉर्न वडापावपर्यंत कसा आलाय हे जाणून घेऊयात या खास लेखामध्ये.

जन्म…

१९६६ साली दादर स्टेशनाबाहेर अशोक वैद्य यांच्या खाद्यपदार्थाच्या गाडीवर वडापावचा जन्म झाला असं मानलं जातं. याच काळात दादरमध्येच सुधाकर म्हात्रेंचा वडापावही सुरू झाल्याचं जुने मुंबईकर सांगतात. केवळ बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याऐवजी बटाट्याच्या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलात तळून बटाटेवडे बनवण्यास सुरूवात झाली.

सुरुवातीचा काळ…

वडापाव सुरू झाला, त्यावेळी तो १० पैशाला विकला जायचा. आज अगदी पाच रुपयांपासून मॉलमध्ये ८० ते १०० रुपयांपर्यंत वडापाव मिळतो. आज अठरा तासांहून अधिक काळ मिळणारा वडापाव सुरुवातील केवळ सहा ते सात तास मिळायचा. दुपारी दोनच्या सुमारास गाडी लागायची आणि आठ-साडेआठ पर्यंतच ती गाडी सुरु असायची. दादर, परळ, गिरगावमध्ये मराठी उपाहारगृहांची संख्या वाढल्यानंतर तिथे बटाटावड्याला हक्काचं घर मिळालं. मात्र सुरुवातील बरीच वर्षे केवळ बटाटावडा खाल्ला जायचा. त्याला पावाने कधीपासून साथ दिली याबद्दल मतमतांतरे आहेत. दादर वगैरे परिसरातील गिरणी कामगारांनी या मराठमोळ्या पदार्थाला चांगलेच उचलून धरले.

रोजगाराचे साधन आणि राजकीय पाठिंबा…

१९७० ते १९८० च्या काळामध्ये मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्याने अनेक तरुण वडापावच्या गाडीकडे रोजगाराचे आणि पोट भरण्याचे साधन म्हणून बघू लागले. त्यानंतर हळूहळू गल्लोगल्ली वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. मराठी मुलांच्या या धडपडीला शिवसेनेने पाठिंबा दिला. बाळासाहेब ठाकरे हे कायमच मराठी माणसाने उद्योगात उतरावे या मताचे होते. त्यामुळेच वडापावच्या गाड्या म्हणजे सुरु केलेले छोटा उद्योगच. त्याचवेळी सेनेने दक्षिण भारतीयांविरुद्ध भूमिका घेतल्याने मुंबईमधील दादर, माटुंग्यासारख्या परिसरामध्ये असणाऱ्या उडपी हॉटेल्समधील दाक्षिणात्य खाद्यपदार्थांना विरोध करण्यासाठी शिवसेनेने वडापाव प्रमोट कऱण्यास सुरुवात केली. उडप्यांचे पदार्थ खाण्याऐवजी आपला मराठमोळा वडापाव खा असे धोरण घेत सेनेने एकाप्रकारे वडापावचे राजकीय स्तरावर ब्रॅण्डींगच केले. शिववडा हा याच पाठिंब्यातून जन्माला आलेली गोष्ट. महानगरपालिकेमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेने अगदी वडापावच्या गाड्या टाकण्यापर्यंतचे नियम बनवत या वडापावला राजकीय पाठिंबाच दिला. आज अनेक ऑफिसेसच्या कॅन्टीनमध्ये, शाळांच्या कॅन्टीनमध्ये वडापावने कायमचे स्थान मिळवले.

वडापावमधील वेगळेपणाच ठरू लागली ओळख…

काळ बदलत गेला तशी स्पर्धा वाढू लागली. त्यामुळेच तोच तोचपणा टाळण्यासाठी मुंबईमध्ये वडापावचे वेगवेगळे प्रकार मिळू लागले आणि वडापावमध्ये आणलेले हेच व्हेरिएशन त्या वडापावची ओळख झाले. उदाहणच द्यायचे झाले तर कीर्ती कॉलेजबाहेरच्या वडापाववाल्याने वड्याबरोबर बेसनाचा चुरा देण्यास सुरुवात केली. तर ठाण्यातील कुंजविहारने पहिल्यांदाच मोठ्या पावाचा प्रयोग केला. सामान्यपणे दोन पावांच्या आकाराचा एक मोठा पाव कुंजविहार स्वत: बनवू लागले आणि जम्बो वडापाव ही कुंजविहारची ओळख झाली. ठाण्यातील असेच दुसरे नाव म्हणजे गजानन वडापाव. बेसनाच्या पिवळ्या चटणीमुळे हा वडापाव केवळ ठाण्यातच नाही तर मुंबईकरांमध्येही लोकप्रिय झाला आणि अनेकांनी या पिठल्यासारख्या चटणीची कॉपी करण्यास सुरुवात केली. तर कल्याणमधील वझे कुटुंबाने सुरु केलेला वडापावच्या दुकानामध्ये वडापाव ग्राहकांना खिडकीमधून दिला जायचा म्हणून तो वडापाव खिडकी वडापाव नावाने लोकप्रिय झाला.

परदेशी व्हर्जन…

१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात दाखल झालेल्या परदेशी बॅण्डसनेही वडापावचा धसका घेतला होता असं म्हणता येईल. कारण भारतीय बाजारपेठेमध्ये उतरतानाच मॅक-डोनाल्ड्ससारख्या बड्या ब्रॅण्डने भारतीयांसाठी वेगळा मेन्यू तयार केला. यामधील विशेष बाब म्हणजे वडा-पावला टक्कर देण्यासाठी मॅक-डीने ‘मॅक आलू टिक्की’ हा बर्गर स्वरूपातील वडापावचा परदेशी भाऊच जन्माला घातला. बटाट्याची पॅटी आणि पाव हे बेसिक तसेच ठेवत त्याला थोडा चकाचक लूक देऊन हा परदेशी वडापाव विकला जाऊ लागला.

फ्युजन…

वडापाव झाला, मॅक आलू टिक्कीसारखे त्याचे परदेशी भाऊही भारतामध्ये दाखल झाले आणि मग या दोघांचे फ्युजनही २००० सालापासून मुंबईकरांना उपलब्ध झाले. मुंबईतीलच धीरज गुप्ता या तरुणाने जम्बोकिंग नावाने वडापावला परदेशी लूक दिला. फरक इतकाच की ‘मॅक आलू टिक्की’मध्ये नसणारे बेसनाचे आवरण या फ्युजन वडापावमध्ये कायम ठेवण्यात आले होते. या वडापावला इंडियन बर्गर असे नाव देण्यात आल्याने मुंबईबाहेरचे लोक मुंबईच्या खऱ्याखुऱ्या वडापावऐवजी या आकर्षक दिसणाऱ्या आणि छान पद्धतीने सादर केल्या जाणाऱ्या वडापावच्या प्रेमात पडले. त्यानंतर गोली सारख्या ब्रॅण्डचा जन्म झाला. आणि स्वच्छतेच्या नावाखाली हे प्रयत्न बऱ्यापैकी यशस्वी झालेत असचं म्हणावं लागेल.

ब्रॅण्डेड वडापाव, स्ट्रीटफूड फेस्टीव्हल्स आणि वडापाव ट्रेल्स...

या ब्रॅण्डेड वडापावमुळे आणखीन परदेशी पदार्थांना वडापावच्या जोडीला साथ देण्यास सुरुवात केली. यातूनच चीज वडापाव, नाचो वडापाव, शेजवान वडापाव, मसाला वडापाव, स्वीटकॉर्न वडापाव, मेयोनिज वडापावसारखे भन्नाट कॉम्बिनेश्नस मुंबईकरांच्या जीभेचे चोचले पुरवू लागले. त्यातही आधी एकाच आकारात मिळणारा वडापाव ब्रॅण्डींगमुळे मिनी, नॉर्मल आणि जम्बो अशा तीन प्रकारांमध्ये मिळू लागला. आता तर साधा ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड प्रकारातही वडापाव मिळू लागले आहेत. वर्षातून अनेकदा मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सही मुंबईच्या या लाडक्या वडापावच्या प्रेमात असल्याचे त्यांनी भरवलेल्या स्ट्रीट फूड फेस्टीवलमधील वडापावच्या व्हरायटीमधून दिसून येते. तर सायकल ट्रेलसारख्या वडापाव खाद्य भटकंतीचे आयोजनही अनेक खाद्यप्रेमी करतात. या खाद्य भ्रमंतीमध्ये मुंबईतील लोकप्रिय वडापाव स्टॉल्सवरील वडापावची चव चाखण्याची संधी तर मिळतेच शिवाय त्या स्टॉलचा इतिहासही सांगितला जातो.

टेकसेव्ही वडापाव…

आज अगदी झोमॅटोवर रिव्ह्यू देण्यापासून ते स्वीगीवरून वडापाव ऑर्डर कऱण्यापर्यंत मुंबईकर टेकसेव्ही झाले असले तरी रस्त्यावरील गाडीवर किंवा प्रत्यक्षात तिथे जाऊन वडापाव खाण्यातील मज्जा काही वेगळीच आहे. म्हणूनच की आज इंटरनेटवर मुंबईतील लोकप्रिय वडापाव स्टॉलचे पत्ते सांगणारे विशेष नकाशेही गुगल मॅप्सवर सहज उपलब्ध आहेत.

परदेशातही वडापावचा बोलबाला…

अमेरिकेच्या ऱ्होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठात हॅरिस सॉलोमन हा तिशीतला विद्यार्थ्याने वडापाव या विषयावर पीएच.डी. केली आहे.

लंडनमध्ये मुंबईतील रिझवी कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्ट २०१० रोजी वडापावचे हॉटेलच टाकले आहे. सुजय सोहनी (ठाणे) आणि सुबोध जोशी (वडाळा) या दोघांनी सुरु केलेल्या श्री कृष्ण वडापाव नावाच्या या हॉटेलच्या उद्योगातून ते आज वर्षाला चार कोटींहून अधिक रुपये कमावतात.

तळकोकणातील सावंतवाडीतील ‘फेमस’ वडापाव –

१) पेडणेकरांचा वडापाव – सावंतवाडी शहरातही वडापावची अनेक स्टॉल्स आहेत. यात सर्वात फेमस आहे तो ‘पेडणेकर यांचा वडापाव’. सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सुनील पेडणेकरांचा वडापाव म्हणजे लई भारी! येथे वडापाव सोबत खमंग चटणी आणि तळलेल्या मिरचीचा स्वादाची बातच न्यारी!  म्हणून तर सावंतवाडी शहर आणि सिंधुदुर्गातील वडापाव प्रेमी सुनील पेडणेकर यांच्या वडापावची चव चाखण्यात अग्रेसर असतात. सावंतवाडीतून कुडाळ येथे जाताना गोविंद चित्रमंदिरसमोर त्यांचा वडापावचा स्टॉल आहे तर दुसरी शाखा मोती तलाव शेजारी एस. पी. के. महाविद्यालयाच्या दुसऱ्या गेटच्या बाजूला स्टॉल आहे.

२) ‘संजू’चा वडापाव –

सावंतवाडीतील ‘संजूचा वडापाव’ देखील खूप प्रसिद्ध आहे. सावंतवाडीतील अनेक वडापाव प्रेमी संजूच्या स्टॉलला हमखास भेट देऊन वडापाववर ताव मारत असतात. येथे येऊन वडासोबत मस्त चटणी आणि तळलेल्या मिरच्या खाऊन खवैय्ये चांगलेच सुखावतात.

३) ‘चंदू भुवनचा वडा चटणी’ फेमस – सावंतवाडी शहरातील खवैय्यांसाठी पर्वणी असलेले चंदू भवन या हॉटेलातील वडा आणि चटणी म्हणजे कया बात ! अनेक खवैय्ये येथील वडा आणि चटणी यावर आपली भूक भागवतात तर घरी जाताना अनेक जण सोबत पार्सलही नेत असतात.

४) आरपीडी शाळेच्या कॅन्टीनचा वडापाव –
शहरातील प्रसिद्ध असलेल्या राणी पार्वती देवी हायस्कूलच्या गेटवर सायंकाळी वडापावचा स्टॉल म्हणजे वडापाव प्रेमींचे गप्पा मारण्याचे हक्काचे ठिकाण. अनेक वडापाव प्रेमींची पावले सायंकाळ झाली की ‘आरपीडी’ शाळेच्या दुसऱ्या गेटकडे वळतात व तेथे वडापाव आणि चटणीचा आनंद उपभोगताना नजरेस पडतात.

५) साधलेंचा वडापाव – हा वडापाव प्रेमींना खूप भावतो. सावंतवाडीतून पणजीकडे जाताना माजगाव रस्त्यावर साधले वडापाव सेंटर आहे. या सेंटरवर जाऊन अनेक जण आपली भूक भागवत असतात.

मुंबईतील उत्तम वडापाव मिळणारी काही ठिकाणे…

आराम वडापाव
श्री कृष्णा बटाटावडा
मामा काणे
आस्वाद
चेंबूर जीमखाना
अशोक वडापाव
किर्ती वडापाव

ठाण्यातील उत्तम वडापाव मिळणारी काही ठिकाणे…

कुंजविहार
गजानन वडापाव
राजमाता वडापाव
दुर्गा वडापाव
संतोष वडापाव

23 ऑगस्ट जागतिक वडापाव दिन : मुंबईतल्या ‘या’ वडापावची टेस्ट एकदा तरी घ्यायलाच हवी…

‘वडापाव’ ची चव जगात भारी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महाराष्ट्रात वडापाव न खालेल्ला माणूस सापडणं थोडं कठीणच आहे. २३ ऑगस्ट जागतिक वडापाव दिन म्हणून ओळखला जातो. मुंबईत अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. तसंच येथील वडापावची खासियत गेली अनेक वर्ष कायम आहे. अहो इतकंच काय तर अनेक मुंबईकरांसाठी वडापाव म्हणजे एकवेळचं जेवणचं असतं. आज जागतिक वडापाव दिनानिमित्त काही प्रसिद्ध वडापावबद्दल माहिती जाणून घेऊ. अलीकडच्या काळात वडापावमध्येही बरेच बदल होत आहेत. चायनीज वडापावलाही हल्ली खूप मागणी असते.

आनंद वडापाव :

विलेपार्लेतील मिठीबाई कॉलेजसमोर असलेला ‘आनंद वडापाव’. या वडापावला आतापर्यंत सर्वाधिक वेळा मुंबईतील बेस्ट वडापावचा किताब मिळालेला आहे.

कॉलेजसमोर असणाऱ्या आनंद स्टॉलवर हा वडापाव २५ रु. किंमतीत विकला जातो. या वडापावची खास बात म्हणजे पावाला बटर आणि एक खास प्रकारची सुकी चटणी याला लावून मिळते. यासह ग्रील वडापावही इथला प्रसिद्ध आहे.

गजानन वडापाव :

ठाणे, कल्याण या परिसरातील सर्वात प्रसिद्ध वडापाव म्हणजे ‘गजानन वडापाव’. याचं वैशिष्ट्य म्हणजे वड्यासोबत मिळणारी बेसनची चटणी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा खवय्यांच्या जिभेची चव आणखी वाढवतो. छत्रपती संभाजी रोड, नौपाडा, ठाणे, डोंबिवली स्थानकाबाहेर १५ रुपयांना गजानन वडापावची चव एकदा चाखून बघा.

कीर्तीचा वडापाव :

दादर (पूर्व) येथील कीर्ती कॉलेजजवळ अशोक वडापाव म्हणून एक छोटा स्टॉल आहे. येथे वडापावसोबत दिला जाणारा भजीचा चुरा सर्वाधिक प्रसिद्ध आहे. वड्यासोबतच या चुऱ्याची मागणी खवय्ये अधिक करतात. हा वडापाव २० रुपयाला आहे.

मसाला वडापाव :

मुलुंड (पश्चिम) येथील कालिदास नाट्यगृहाजवळ असलेल्या एका छोट्या स्टॉलवरील ही रेसिपी खवय्यांना आकर्षित करते. वड्यासोबत पावाला लावून दिला जाणारा मसाला याची खासियत आहे. २५ रुपयात हा मसाला वडापाव विक्री केला जातो.

श्रीकृष्णचा वडापाव :

तुम्ही दादरमध्ये गेलात नि श्रीकृष्णचा वडापाव खाल्ला नाहीत, असं होऊच शकत नाही. दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर छबिलदास शाळेच्या गल्लीत हा वडापाव मिळतो. या वडापावची चव चाखण्यासाठी ही गल्ली कायम खवय्यांच्या गर्दीने गजबजलेली असते.

भाऊ वडापाव :

वाल्मिकी नगर, भांडुप येथील सर्वात प्रसिद्ध वडापाव म्हणजे ‘भाऊ वडापाव’. इतर वड्यांपेक्षा या वड्याचा आकार काहीसा मोठा असल्याने एका वडापावातच खाणाऱ्याचे पोट भरते. तर यासोबत दिली जाणारी आलं आणि नारळाची चटणी वड्याला आणखी चविष्ट बनवते. एन.एस.रोड मुलुंड (पश्चिम) येथेही याची एक शाखा सुरू झाली आहे.

ग्रॅज्युएट वडापाव :

भायखळा (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर ‘ग्रॅज्युएट वडापाव’ मिळतो. येथे दिल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवतात.

एमएमचा वडापाव :

मालाड (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर एमएम मिठाईवाला यांचा वडापाव मिळतो. मालाड येथे राहणारी एकही व्यक्ती अशी नाही की जिने हा वडापाव खाल्लेला नाही. या वडापावची महती एवढी आहे की बोरिवली-विरारला जाणारे प्रवासीदेखील मालाडला उतरून या वडापावचा आनंद घेऊन पुढचा प्रवास करतात. मोठा वडा, मोठा पाव, गोड-तिखट चटणी, मिरची असा हा भरगच्च वडापाव आहे.

ओजा स्वीट्सचा वडापाव :

जोगेश्वरी (पश्चिम) रेल्वे स्थानकाबाहेर ओजा स्वीट्स या दुकानात चवदार वडापाव मिळतो. जोगेश्वरी रेल्वे स्थानकामधून बाहेर पडणारे अनेक जण या वडापावचा आस्वाद घेतात.

ठाकूर वडापाव :

डोंबिवली (पूर्व) येथे असलेला हा वडापाव गेली अनेक वर्षं खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवीत आहे. १९७३ मध्ये या वडापाव विक्रीस सुरुवात झाली.

 

🍔 सर्व वडापावप्रेमींना खमंग पोटभर शुभेच्छा… 🍔

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles