वेंगुर्ला : येथील साहस प्रतिष्ठानच्या संस्थापिका व ‘साहस’च्या माध्यमातून दिव्यांगांची अविरत सेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रूपाली दीपक पाटील यांची नुकतीच ‘विधी स्वयंसेवक’ म्हणून स्तुत्य निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांचे मार्फत उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे विधी सेवा केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. तेथील दुर्बल घटकांना विधी सहाय्य मिळविण्यासाठी व मदत करण्यासाठी प्राधिकरणामार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘विधी स्वयंसेवक’ म्हणून काम करण्यासाठी सन 2025 – 2026 या कालावधीकरिता रूपाली पाटील यांची निवड करण्यात आलेली आहे. तसे निवडपत्र अध्यक्ष – जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी त्यांना पाठविले आहे.
दरम्यान, रूपाली पाटील या तळमळीने सामाजिक कार्य करीत असून दिव्यांग सेवा, अनाथांची सेवा तसेच रुग्णसेवा आदी कामांमध्ये त्या आपले सक्रिय योगदान देत आहेत. त्यांच्या ह्या योगदानाची दखल घेत तालुका विधी सेवा समिती वेंगुर्लाद्वारा दिवाणी न्यायालय वेंगुर्ला यांच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली आहे. रूपाली पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.