- ७५ व्या वाढदिवसासाठी डॉ. नसिमा दिदींना हार्दिक शुभेच्छा!!!
आपल्या भारत देशात जन्मताच अपंग असणाऱ्यांची संख्या अगणित आहे. काहीजण नशीबाला दोष देतात तर काही जण रडत कुडत आपल आयुष्य व्यतीत करत असतात. पण अशा कोट्यावधी दिव्यांग बांधवाना जगण्याची नवी उमेद आणि प्रेरणा देणारी जी काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढी कर्तृत्वान माणसे आहेत, त्यामध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल ते म्हणजे डॉ. नसिमा हुरजूक. नसिमा दिदींचा प्रवास हा अतिशय थक्क करणारा आहे. शरीराने धडधाकड असणारी माणसे अनेकदा छोट्याशा प्रसंगाने डोक्याला हात लावून बसतात. आणि समाजातील सहानुभूतीचे उपकारी कोपरे शोधत असतात. अशा लोकांना डॉ. नसिमा दिंदीची संघर्षगाथा निश्चित फार मोठे बळ देऊ शकते.

खरे तर नसिमा दिदीं या जन्मतःच अपंग नव्हत्या. अगदी किरकोळ पाठीच्या दुखण्याचा इलाज करण्यासाठी त्या दवाखान्यात अॅडमीट झाल्या आणि दुखण्याचे मुळ हे स्पायनल कॉडमध्ये असल्याने त्या पॅराप्लेजिकच्या पेशंट झाल्या. परिणामी कमरे खालून त्या पूर्ण पणे लुळ्या पडल्या.


शाळेमध्ये खेळ आणि नृत्यात अग्रेसर असणारी सोळा वर्षाची मुलगी जेव्हा तीन चाकाच्या खुर्चीला कायमची खिळते हे वास्तव स्विकारणे कुणासाठीही शक्यच नव्हते. पॅराप्लेजिच्या दुखण्याने अंर्तबाह्य उन्मळून न पडता पुढील आयुष्य स्वतःसाठी आणि हजारो दिव्यांसाटी जगण्याची उमेद बाळगून समाजातील अनेक दानशुर व्यक्तींच्या मदतीने दिंदीनी कुडाळ तालुक्यातील माणगांव खोऱ्यातील मोरे या अतिशय दुर्गम भागात स्वप्ननगरीची स्थापना केली. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आणि विशेषतः दिव्यागांसाठी मोठया ताकदीने काम करण्यासाठी हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप कोल्हापूर ही संस्था स्थापन करून वसतीगृह, प्रशिक्षण केंद्रे, आणि दिव्यांगाना आत्मर्निभर करण्यासाठी काजू प्रक्रिया उद्योग अशा माध्यमांतून दिव्यांगाना एक हक्काचा आधार हा नसिमादिदींच वाटू लागल्या. दानशूर व्यक्ती, धर्मादाय संस्था यांनी सढळ हस्ते मदतीचा हात पुढे केल्याने मोऱ्याची स्वप्ननगरी खुलू लागली. अतिशय शिस्तबद्ध चालवलेला हा प्रकल्प अल्पवधीतच माझ्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यासाठी जणू आळंदीच वाटू लागली.


तसे पहायला गेले तर मी दिदींच्या संपर्कात तीस वर्षापूर्वी आलो. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हे पर्यावरण मंत्री असताना त्या पहिल्यांदा काही कामानिमित्त माझ्या माजगाव येथील जुन्या घरी आल्या होत्या. त्यानंतर स्नेह जुळला आणि दिंदीच्या मी कायमचा प्रेमात पडलो. हे सगळ काम करत असताना आपण आणि आमच्या बरोबरच्या दिव्यांगाना आम्ही दिव्यांग आहोत ही भावनाच दिदीनी संपवून टाकली. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला. त्यांच्या पंखात बळ निर्माण केले. स्वप्ननगरीत बारा एकर जागेत दिव्यांगांच्या पुर्नवसनासाठी उभा केलेला प्रकल्प विशेषत्वाने काजू प्रक्रीया युनीट आणि त्यामधून दोनशेहून जास्त दिव्यांगाचे पुर्नवसन हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
कोरोना काळात काजू युनीट सुमारे दोन वर्षे बंद होते. संस्थेवर आर्थिक संकट होते. पण दिदीने मोठ्या हिमतीने त्या काजू प्रक्रिया प्रकल्पाला पुन्हा नवी उर्जा प्राप्त करुन दिली. यासाठी फार मोठी मदत झाली ती बजाज उद्योग समुहाची. या उद्योग समुहाने आपल्या सी.एस.आर मधून तब्बल दोन कोटी सव्वीस लाखाचा निधी दिल्याने काजू प्रक्रीया प्रकल्प पुन्हा नव्या जोमाने सुरु झाला.
डॉ. नसिमा दिदींना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या देशातील अनक मान्यवर नेत्यांच्या शुभहस्ते दिंदीचा यशोचित सत्कार झाला. थोर शास्त्रज्ञ व राष्ट्रपती स्व कलाम साहेब, तात्कालीन पंतप्रधान अटलजी, स्व. मनमोहन सिंग, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे तात्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर जोशी, गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर, अभिनेते अमीर खान, नाना पाटेकर अशा विविध क्षेत्रातील महामानवांनी दिदींना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दिव्यांगासाठी दिलेल्या योगदानाची पोच पावती दिलेली आहे.
दिदींच्या या प्रवासात त्यांच्या कुटुंबियानी त्याना साथ दिली. देश परदेशातील अनेक मित्र -मैत्रणींनी सदैव मदतीचा हात दिला. त्यांच्या पाठीशी रात्रदिवस त्यांची सावली म्हणून काम करणारे साहसचे विश्वस्त श्री. सताराम पाटील आणि खऱ्या अर्थाने दिदींचा आधारवड असलेल्या मधुताई पाटील यांचेही योगदान फार महत्वाचे आहे. गेल्या सुमारे तीस वर्षापासून आदणीय दिदींच्या या संघर्षमय प्रवासाचा एक साक्षिदार म्हणून तसेच त्यांच्या या कार्यात एक बिंदू म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्यच समजतो. वयाच्या सोळाव्या वर्षी तीन चाकाच्या खुर्चीला खिळल्यावर दिदींनी एका टिंबापासून आपल्या कार्यकर्तृत्वाची तयार केलेली रेषा आता ठळकपणे समाजासमोर आहे. धडधाकट माणसाना जे जमणार नाही ते दिव्यांगासाठीचे कार्य दिदि वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी पण करत आहेत.
न थकता, न दमता आणि कधीही न थांबता दिव्यांगाच्या कल्याणाचा हा रथ त्या ओढत आहे. अगदी मनापासून त्यांचे हे महान कार्य शब्दबध्द करणे फारच कठीण आहे.
दोन सप्टेंबर हा दिंदीचा वाढदिवस. 75 वर्षे त्यांना पूर्ण होत आहेत. आणि योगायोग म्हणजे त्यांच्या या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या एका आणखीन मोठ्या स्वप्नाची पूर्ती होणार आहे. त्यांच्या बरोबर गेली काही वर्षे ज्या दिव्यांगानी काम केले ते सर्व त्यांच्या जीवनाचेच एक महत्वपूर्ण घटक बनले आहेत. त्या सर्वाचे पुर्नवसन करावे या इच्छेने साहसच्या वतीने दिदींच्या वाढदिवसाच्या पवित्र दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील करनूर येथे दोन एकर जागेत अंदाजे दहा कोटी रुपये खर्चाचे वीस हजार स्केअर फूटाचे बांधकाम असलेले हे भव्य दिव्य संकुल उभे राहणार आहेत. दिदींच्या वाढदिवसा दिवशीच म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भूमीपुजनाचा सोहळा कोल्हापूरचे खासदार मा. श्री. शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून प्रमुख अतिथी म्हणून उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री. हसन मुश्रीफ, कोल्हापूरचे पालकमंत्री श्री. प्रकाश आंबिटकर, खासदार श्री. धनंजय महाडिक, खासदार श्री. धैर्यशील माने हे उपस्थित रहाणार आहेत.
दिदीनी फक्त स्वप्न पाहिली नाहीत किंवा आपण दिव्यांग आहोत म्हणून खचल्या नाहीत. दरदिवशी उगवणारा सुर्य हा नवकिरणांचा अविष्कार करत असतो. दिदि प्रत्येक क्षण आलेल्या परिस्थितीला धेर्याने तोंड देऊन जगल्या. फक्त आणि फक्त दुर्लक्षित दिव्यांगासाठी हसऱ्या चेहऱ्यामागे दडलेली दुःख. क्लेशाची मुक मौन गाथा सहन करुन दिदिंनी आपले दुःख गिळले आणि इतर दिव्यागांच्या तोंडावरच्या हसूमध्ये आपला आनंद शोधला. काही माणसंच अशी असतात की, ती काजव्यालाही सुर्य बनवतात. त्यापैकी दिदी एक आहेत. दिदी तुमच्या या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला तुमचा एक छोटा भाऊ म्हणून शुभेच्छा देतो. परमेश्वराने तुम्हांला उत्तम आरोग्य व दिर्घायुष्य देवो यासाठी मनोमन प्रार्थना करतो.!


