नवी दिल्ली : एक प्रियकर त्याच्या प्रेयसीला तब्बल दहा वर्षे धोका देत होता आणि या दरम्यान तो अन्य सहा तरुणींना डेट करत होता. त्याने आपली ही लाडी-लबाडी लपवण्यासाठी एक विशेष सिस्टीम करुन ठेवली होती. परंतू या ढोंगीचा डाव एका कुत्र्याने उलटवला.
हा चमत्कारीक प्रकार ब्रिटनच्या डॅनी नावाच्या एका तरुणाने केला होता. तब्बल दहा वर्षे त्याच्या गर्लफ्रेंडला धोक्यात ठेवून एकाच वेळी सहा वेगवेगळ्या तरुणींसोबत नाते कायम ठेवले होते. डॅनी याने हे सर्वकाही एका खेळासारखे सुरु ठेवले होते. आपला खोटेपणा लपवण्यासाठी त्याने एक कलर कोडेड कॅलेंडर तयार केले होते, तीन फोन देखील त्याच्याकडे होते आणि एका पोपटाची देखील त्याने या कामी मदत घेतली होती.
‘द सन’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार ३८ वर्षीय डॅनी आपल्या सर्व प्रेमीकांना मॅनेज करण्यासाठी एक कलर – कोडेड कॅलेंडरचा वापर केला होता. यात वेग-वेगळे रंग हे निश्चित करायचे की कोणत्या दिवशी कोणत्या मुलीला भेटायचे. तसेच गर्लफ्रेंडचे तिच्या फोनवरुन लक्ष हटवण्यासाठी त्याने एका पोपटाला खास प्रशिक्षण दिले होते. जेव्हा त्याच्या फोनवर कोणतेही नोटिफीकेशन यायचे, तेव्हा नेमका पोपट विचित्र आवाज काढायला सुरुवात करायचा. त्यामुळे मुलींचे फोन ऐवजी पोपटाकडे लक्ष जायचे.
डॅनी तीन फोनचा वापर करायचा. एक फोन नॉर्मल कॉल्ससाठी आणि इतर दोन फोन तो चिप्सचे डब्बे आणि नकली रोपट्याच्या कुंडीत लपवून ठेवायचा. एकदा तर त्याने प्रेयसीच्या संशय येऊ नये म्हणून आपल्या घरातील बॉयलरचे प्रेशर कमी केले होते.
कुत्र्याने उलटवला डॅनीचा ‘हा’ सारा खेळ!
एका कुत्र्याने डॅनीचा हा सारा खेळ उलटवून टाकला आणि त्याला उघडेपाडले. दहा वर्षांचा त्याचा हा खेळ संपला. त्याचे झाले का त्याच्या एका गर्लफ्रेंडकडे कॉकपू जातीचा एक कुत्रा होता. जेव्हा तो त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडकडे परतला, तेव्हा त्याच्या शर्टावर कुत्र्याचे काही केस चिकटले होते आणि त्याच्या या गर्लफ्रेंडला कुत्रे अजिबात म्हणजे अजिबात पसंत नव्हते. त्यामुळे तिला डॅनीवर संशय आला आणि तिने प्रश्नांची सरबत्ती केली आणि त्याचे सगळे डाव उघड झाले.


