वेंगुर्ला : नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हिंदू एकात्मतेचा जागर संदेश देण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, वेंगुर्ला व हिंदुधर्माभिमानी मंडळींच्या वतीने भव्य दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. ही दौड उद्या २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता वेंगुर्ल्यातील ग्रामदैवत श्रीरामेश्वर मंदिरापासून सुरू होणार आहे. दौडीदरम्यान शहरातील प्रमुख देवी मंदिरांना भेटी देण्यात येणार असून, देवीसमोर “देव, देश आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी बळ मिळावे” अशी प्रार्थना करण्यात येईल.
या दौडमध्ये शहरातील तरुणाई, महिला भगिनी तसेच सर्व समाजघटकांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. दौड जरी उल्लेख असला तरी चालत मार्गक्रमण करत धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणार आहे.
धार्मिक उत्साहाचा आविष्कार –
नवरात्रोत्सव हा शक्तीची आराधना आणि भक्तिभावाचा उत्सव मानला जातो. या पार्श्वभूमीवर दुर्गामाता दौड ही तरुणाईच्या शौर्य, पराक्रम आणि भक्तीभावाची प्रचिती घडवणारी ठरते. ढोल-ताशांचा गजर, जयघोष, भगवे झेंडे आणि पारंपरिक वेशभूषा यामुळे वेंगुर्ल्याच्या रस्त्यांवर उत्सवमय वातावरण निर्माण होणार आहे.
दौडचा मार्ग –
श्रीरामेश्वर मंदिरापासून सुरुवात झाल्यानंतर दौड शहरातील विविध देवी मंदिरांपर्यंत जाईल. प्रत्येक ठिकाणी देवीच्या दर्शनाबरोबर सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे. हिंदू संस्कृतीची एकजूट, धर्मनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन या दौडीतून घडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
सहभागासाठी आवाहन –
शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांच्याबरोबरच वेंगुर्लेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दुर्गामाता दौड भव्यतेने यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे


