सावंतवाडी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा प्रकारात सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोलीच्या 14 वर्ष, 17 वर्ष व 19 वर्ष वयोगटाखालील तीनही स्पर्धांमध्ये सैनिक स्कूलचे संघ विजयी झाले.
14 वर्षे वयोगटातील मुलांचा अंतिम सामना इन्सुलीविरुद्ध सैनिक स्कूल यांच्यामध्ये झाला. यात सैनिक स्कूलच्या संघाने 11-00 गोल फरकाने विजय मिळवला. यात सोहम काणेकर याने सर्वाधिक सात गोल नोंदवले.
17 वर्षे वयोगटातील अंतिम सामना सिंधुदुर्ग सैनिक स्कूल विरुद्ध इन्सुली यांच्यात झाला. त्यात सैनिक स्कूलने 14-03 गोल फरकाने विजय संपादन केला. यात गौतम खांडेकर, एरोन फर्नांडिस, आणि महादेव देऊलकर यांनी प्रत्येकी तीन गोल केले.

19 वर्ष वयोगट मुले यांचा अंतिम सामना सैनिक स्कूल आणि खेमराज मेमोरियल हायस्कूल, बांदा यांच्यात झाला. सैनिक स्कूलच्या संघाने 11-03 गोल फरकाने हा ही अंतिम सामना जिंकून जिल्हास्तरीय शालेय हँडबॉल स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. या स्पर्धेत साईश मेंगाने याने चार तर स्वयम पाटील याने तीन गोल नोंदवले व हँडबॉल स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. सर्व विजयी स्पर्धकांचे व हँडबॉल मार्गदर्शक श्री सतीश आईर सर व इतर क्रीडा प्रशिक्षक यांचे हँडबॉल स्पर्धेतील या दैदीप्यमान प्रदर्शनाबद्दल पॅट्रॉन ब्रिगेडियर सुधीर सावंत, अध्यक्ष सुनील राऊळ, सचिव जॉय डॉन्टस, प्राचार्य नितीन गावडे, कार्यालयीन सचिव दीपक राऊळ, सर्व संचालक व पालक वर्ग यांनी कौतुक करून विभागीय स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


