सिंधुदुर्ग : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष आणि समाजकार्यातून राज्यभर आपली स्वतंत्र छाप उमटवणारे दयानंद कुबल यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांशी संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्या कार्यकौशल्याने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने तृप्ती धोडमिसे यांनी समाजाच्या विविध स्तरात नवे आदर्श निर्माण केले आहेत. त्यांची कार्यपद्धती युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी घेतलेले पुढाकार विशेष ठरत आहेत.
या भेटीत युवकांच्या रोजगार, शिक्षणाच्या संधी, महिला सबलीकरण तसेच आरोग्यविषयक उपक्रमांबाबत विधायक संवाद झाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही काही महत्त्वपूर्ण विचारमंथन करण्यात आले.
यावेळी दयानंद कुबल यांच्यासोबत संस्थेचे सहकारी प्रथमेश सावंत आणि गौरी आडेलकर उपस्थित होत्या.
जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमांना प्रशासनाचे सहकार्य लाभावे, तसेच तरुणाईला मार्गदर्शन मिळावे या हेतूने हा संवाद महत्त्वपूर्ण ठरल्याचे यावेळी श्री. कुबल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी अशा सकारात्मक चर्चांमधून समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जाऊ शकतात, असा विश्वास व्यक्त केला. ही सदिच्छा भेट समाजकार्याच्या क्षेत्रात नवीन दिशा दाखवणारी ठरली असून पुढील काळात जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून युवक व महिलांना नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


