विशाखापट्टणम : टीम इंडियाला आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत 330 धावा करुनही गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 331 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान कॅप्टन एलिसा हिलीच्या 142 धावांच्या जोरावर 6 बॉलआधी 3 विकेट्स राखून पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने 49 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून विजयी आव्हान पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने यासह वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा वनडे क्रिकेटमधील 302 या सर्वोच्च विजयी धावसंख्येचा विक्रम मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह या स्पर्धेत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. तर टीम इंडियाला सलग आणि एकूण दुसऱ्या पराभवाला सामोरं जाव लागलं. टीम इंडियाचा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ऑस्ट्रेलिया विरुद्धचा हा 11 वा पराभव ठरला.
ऑस्ट्रेलियाची बॅटिंग –
एलिसा हिली आणि फोबी लिचफिल्ड या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाला कडक सुरुवात करुन दिली. या जोडीने 85 धावांची भागीदारी केली. लिचफिल्डच्या रुपात ऑस्ट्रेलियाने पहिली विकेट गमावली. लिचफिल्डने 40 धावा केल्या. त्यानतंर एलिस पेरी सेट झाली. तिने कॅप्टनसह दुसऱ्या विकेटसाठी 69 धावा जोडल्या. मात्र दुखापतीमुळे पेरीला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावं लागलं.
एलिसाचं शतक –
त्यानंतर बेथू मूनी 4 धावावंर आऊट झाली. तर एनाबेल सदरलँडला भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाने त्यानंतरही फटकेबाजी सुरुच ठेवत आवश्यक रनरेटसह कोणतीही तडजोड केली नाही. एलिसाने या दरम्यान 85 चेंडूत शतक झळकावलं.
हीलीने चौथ्या विकेटसाठी एश्ले गार्डनरसह 95 रन्सची पार्टनरशीप केली. या जोडीने ऑस्ट्रेलियाला विजयाच्या आणखी जवळ आणून ठेवलं. एलीसा 142 रन्स करुन आऊट झाली. एलिसाने या खेळीत 21 फोर आणि 3 सिक्स लगावले. श्री चरणीने एलिसाला आऊट केलं. त्यानंतर ताहलिया मॅक्ग्रा 12 तर एश्ले गार्डनर 45 आणि सॉफी मॉलिन्यूने 18 धावा केल्या.
त्यानंतर रिटायर्ड हर्ट झालेली पेरी मैदानात आली. पेरीने किम गार्थसह उर्वरित धावा केल्या आणि षटकार लगावत ऑस्ट्रेलियाला विजयी केलं. या दोघींनी आठव्या विकेटसाठी 28 रन्सची पार्टनरशीप केली. पेरीने नाबाद 47 धावा केल्या. तर टीम इंडियासाठी चरणीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
टीम इंडियाची कडक सुरुवात आणि घसरगुंडी –
टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाची अप्रतिम सुरुवात झाली. मात्र त्यानंतरही टीम इंडिया पूर्ण 50 ओव्हर खेळण्यात अपयशी ठरली. स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 80 धावा केल्या. तसेच प्रतिका रावल हीने 75 धावांचं योगदान दिलं. या दोघींनी 155 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरनेही वेगाने धावा केल्या. मात्र एकीलाही मोठी खेळी करता आली नाही. हर्लिन देओल 38, कॅप्टन हरमनप्रीत कौर 22 आणि जेमिमाह रॉड्रिग्स 33 रन्स करुन आऊट झाल्या. टीम इंडियाची 36.2 ओव्हरमध्ये 2 आऊट 234 वरुन 48.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 330 अशी दुर्दशा झाली.


