विशाखापट्टणम : आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. या स्पर्धेतील सहभागी 8 संघांनी प्रत्येकी 4-4 सामने खेळले आहेत. आता पाचव्या आणि निर्णायक फेरीचा थरार रंगणार आहे. या पाचव्या फेरीतील पहिल्या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश आमनेसामने असणार आहेत. एलिसा हीली ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व करणार आहे. तर निगर सुल्ताना हीच्याकडे बांग्लादेशच्या कर्णधारपदाची सुत्र सांभाळणार आहे
गतविजेता ऑस्ट्रेलिया अजिंक्य –
ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेत आतापर्यंत कडक कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. ऑस्ट्रेलियाने 4 सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने त्यापैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 1 सामना पावसामुळे रद्द झाला. ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबलमध्ये 7 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट हा +1.353 असा आहे.
बांग्लादेशची कामगिरी
तर दुसऱ्या बाजूला बांग्लादेशने या मोहिमेतील आपली सुरुवात विजयाने केली. बांग्लादेशने पाकिस्तानला पराभूत केलं. मात्र त्यानंतर बांग्लादेशने सलग 3 सामने गमावले. इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशला लोळवलं. त्यामुळे बांग्लादेशला स्पर्धेत कायम रहायचं असेल तर गुरुवारी कोणत्याही स्थितीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकावं लागणार आहे. मात्र ऑस्ट्रेलियाला रोखणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे या सामन्यात बांग्लादेश कमाल करणार की ऑस्ट्रेलिया विजयी घोडदौड कायम राखणार? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.


