सावंतवाडी : महाराष्ट् राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य स्तरीय आदर्श गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ज्येष्ठ व उपक्रमशील मुख्याध्यापकांची यावर्षी निवड करणायात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्य स्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन ज्येष्ठ, उपक्रमशील व दिर्घकाळ मुख्याध्यापक संघात कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांची निवड करण्यात आली आहे. यात मालवण तालुका मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी कार्यकारीणी सदस्य, माजी विद्या समिती अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष तथा मुख्याध्यापक महामंडळाच्या एज्युकेशनल जर्नलचे संपादक, सामाजिक कार्यकर्ते व त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे ता. मालवण विद्यालयाचे मुख्याध्यापक वामन तर्फे, कुडाळ तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे विद्यमान अध्यक्ष व को. ए. सो. यशवंत राघोजी परब विद्यालय, वसोली ता. कुडाळ विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित परब, कणकवली तालुका मुख्याध्यापक संघाचे विद्यमान सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, माध्यमिक विद्यालय शेर्पे ता. कणकवली विद्यालयाचे मुख्याध्यापक हिदायत आत्तार यांची निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार वितरण सोहळा २६ ऑक्टोबर रोजी कराड तेथील यशवंतराव चव्हाण काॅलेज ऑफ सायन्स येथे होणाऱ्या मुख्याध्यापक संघाच्या राज्यस्तरीय वार्षीक अधिवेशनात शिक्षणमंत्री दादाजी भुसे, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.


