सिडनी : रोहित शर्मा-विराट कोहली या अनुभवी तसेच माजी कर्णधारांच्या जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात नाबाद दीडशतकी भागीदारी करत टीम इंडियाला 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं होतं. भारताने हे आव्हान 38.3 ओव्हरमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. भारताने या विजयासह ऑस्ट्रेलियाला 3-0 ने मालिका जिंकण्यापासून रोखलं. भारताने ही मालिका 1-2 ने गमावली. मात्र रोहित आणि विराट या दोघांनी केलेल्या भागीदारीने चाहत्यांची मनं जिंकली.
टीम इंडियाची कडक सुरुवात –
रोहित आणि कॅप्टन शुबमन गिल या सलामी जोडीने भारताला अप्रतिम सुरुवात करुन दिली. दोघांनी 69 धावा जोडल्या. त्यानंतर शुबमन 24 धावांवर आऊट झाला. शुबमननंतर विराट कोहली मैदानात आला. विराट गेल्या 2 सामन्यांमध्ये सलग शून्यावर बाद झाला होता. मात्र विराटने सिडनीत पहिलीच धाव घेत सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर विराटनेही रोहितसह मैदानात घट्ट पाय रोवले. या जोडीने अखेरपर्यंत नाबाद राहत भारताला एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजयी केलं.
दुसऱ्या विकेटसाठी 168 धावांची नाबाद भागीदारी –
रोहित आणि विराट या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 169 बॉलमध्ये 168 रन्सची नॉट आऊट पार्टनरशीप केली. रोहितने या दरम्यान कारकीर्दीतील 33 वं शतक पूर्ण केलं. रोहितने 125 चेंडूत 96.80 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 121 धावा केल्या. रोहितने या खेळीत 13 चौकार आणि 3 षटकार लगावले. तर विराटने 81 बॉलमध्ये नॉट आऊट 74 रन्स केल्या. विराटने या दरम्यान 7 चौकार लगावले. तर ऑस्ट्रेलियासाठी जोश हेझलवूड याने एकमेव विकेट मिळवली.
टीम इंडियाच्या गोलंदाजांची कमाल –
त्याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची ज्या पद्धतीने सुरुवात झाली ते पाहता 300 धावा सहज होतील असं चित्र होतं. मात्र भारतीय गोलंदाजांनी खरंच कमाल केली. भारताने गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 53 धावांच्या मोबदल्यात शेवटच्या 7 विकेट्स मिळवल्या. भारताने यासह ऑस्ट्रेलियाला 46.4 ओव्हरमध्ये 236 रन्सवर ऑलआऊट केलं.


