मुंबई : मराठी रंगभूमीवरील एक तेजस्वी तारा आणि मालवणी भाषेला वेगळी ओळख देणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं सोमवारी (27 ऑक्टोबर) रात्र 10 वाजून 40 मिनिटांनी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. दहिसर (पूर्व) येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गव्हाणकर यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी (28 ऑक्टोबर) दहिसरच्या अंबावाडी, दौलत नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी, अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव सकाळी 9:30 वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार आहे.

1971 साली रंगभूमीवरील कारकिर्दीला सुरुवात : गवाणकरांनी 1971 मध्ये रंगभूमीवरील आपल्या प्रवासाची सुरुवात केली. त्याच काळात ते ‘एमटीएनएल’मध्ये नोकरीदेखील करत होते, पण नाटकावरील प्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नसे. अशा स्थितीत त्यांनी नोकरीसह रंगभूमीशी घट्ट नातं जोडून घेतलं.
‘वस्त्रहरण’ नाटक प्रचंड गाजलं : गंगाराम गवाणकर यांचं ‘वस्त्रहरण’ हे नाटक प्रचंड गाजलं. या नाटकानं मराठी रंगभूमीवर मालवणी भाषेची प्रतिष्ठा वाढवली आणि मच्छिंद्र कांबळी यांच्यासारखा मालवणी नटसम्राट घडवला. ‘वस्त्रहरण’चे 5 हजारांहून अधिक प्रयोग झाले आहेत.


