सातारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने दरवर्षी अधिवेशनाचे औचित्य साधून दरवर्षी शैक्षणिक क्षेत्रात आणि संघटनात्मक उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुख्याध्यापकांना राज्य स्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी त्रिमूर्ती विकास मंडळ मुंबई संचालित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या प्रशालेचे मुख्याध्यापक, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळाच्या एज्युकेशनल जर्नलचे संपादक, सामाजिक कार्यकर्ते श्री. वामन तर्फे यांना हा पुरस्कार सातारा येथे मान्यवरांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
श्री. वामन तर्फे गेली 31वर्षे ज्ञान दानाचे कार्य करत आहेत. तसेच गेली २७ वर्षे मुख्याध्यापक पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. शैक्षणिक कामगिरी करत असताना संघटनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत.
त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे या विनाअनुदानित, इमारतीसह कोणत्याही भौतिक सुविधा नसलेल्या शाळेत आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात करून ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण देण्यासाठी विशेषतः अर्धवट शिक्षण सोडणाऱ्या मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्थेच्या बरोबरीने प्रयत्न केले. शाळेच्या इमारत बांध कामापासून इतर भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी संस्थेला आपला जादा वेळ देऊन परिश्रमपूर्वक साथ दिली.
निधी गोळा करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केले. शिक्षक म्हणून काम करत असताना अचानक पडलेली मुख्याध्यापक पदाची जबाबदारी पार पाडत असताना अनेक अडचणीना सामोरे जात शाळेच्या प्रगतीचा आलेख चढत्या क्रमाने टिकवण्यासाठी प्रयत्न केले. शैक्षणिक कामगिरी बजावत असताना सामाजिक, संघटनात्मक, सांस्कृतिक धार्मिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला. मुख्याध्यापक संघात सुरुवातीपासूनच एक निष्ठावान सामान्य कार्यकर्ता म्हणून पडेल ते काम केले. नंतर तालुका कार्यकारिणी सदस्य,दोन टर्म मालवण तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, विद्या समिती अध्यक्ष व त्या नंतर जिल्हा अध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ कार्यकारिणी सदस्य व पुढे महामंडळ एज्युकेशनल जर्नल संपादक पद यशस्वीपणे सांभाळत आपली संघटनात्मक कार्यावरील पकड घट्ट केली. या प्रवासात अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करुन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सध्या ते सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष, राज्य मुख्याध्यापक महामंडळ एज्युकेशनल जर्नल संपादक, कै. सिताराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट सचिव, श्री. देव क्षेत्रपाल उत्कर्ष मंडळ, जांभवडे सचिव, जांभवडे पंचक्रोशी रहिवाशी मित्र मंडळ, कणकवली सचिव, श्री. देव गांगेश्वर जीर्णोद्धार मंडळ, जांभवडे उपाध्यक्ष, शिक्षण हक्क समन्वय समिती सचिव, सिंधुदुर्ग जिल्हा विद्यार्थी सुरक्षा समिती सदस्य, मालवण तालुका मुख्याध्यापक संघ सल्लागार, सिंधुदुर्ग मराठा मंडळ, कणकवली कार्यकारिणी सदस्य अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने देण्यात आलेला राज्य स्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार हा त्यांचा दिर्घकालीन कार्याची गौरव आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
वामन तर्फे यांना मुख्याध्यापक महामंडळाचा ‘राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार प्रदान!
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


