नवी दिल्ली : केंद्रातील एनडीए म्हणजेच मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश असलेल्या अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेयरचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या नामांतरणासंदर्भात घोषणा केली आहे. आता, राजधानी पोर्ट ब्लेयरचे नाव श्री विजयपुरम करण्यात येत असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. पोर्ट ब्लेयर एक गुलामगिरीचे प्रतिक होते. त्यामुळे, केंद्रशासित प्रदेशाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेयरचे नाव बदलण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. गुलामगिरीच्या खूणा संपविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या संकल्पातून प्रेरीत होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेयरचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
अमित शाह यांनी ट्विटरवरुन जाहीर केल्याप्रमाणे, अंदमान-निकोबारची राजधानी असलेल्याा पोर्ट ब्लेयरचे नाव आता ‘श्री विजयपुरम’ होत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, श्री विजयपुरम हे नाव आपल्या स्वाधीनताच्या संघर्षाला आणि त्यामध्ये अंदमान-निकोबारच्या योगदानाला दर्शवते. देशाच्या स्वाधीनता आणि इतिहासात या अंदमान-निकोबार बेटाचे अतुलनीय स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदलाचे केंद्र राहिलेली ही भूमी आहे. आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्याचं काम या भूमीतून, या बेटावरुन होत आहे, असेही अमित शाह यांनी म्हटलंय. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडून सर्वात पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकवण्यात आलेलं हे बेट आहे. तसेच, सेलुलर जेलमध्ये वीर सावरकर व अन्य स्वातंत्र्य सैनिकांद्वारे भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या संघर्षाची ही भूमी आहे, असेही अमित शाह यांनी म्हटले.
यापूर्वीही बदलली नावे –
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने यापूर्वीही काही शहरांची व ऐतिहासिक ठिकाणांची नावे बदलली आहेत.अंदमान-निकोबार बेटातील आयलँडचे यापूर्वी देखील नाव बदलण्यात आले आहे. केंद्र सरकारने रोस आयलँडचे नामकरण केले होते, नेताजी सुभाषचंद्र बोस असे या आयलँडचे नाव करण्यात आले आहे. त्यासह, नील आयलँडचे नामांतर शहीद द्वीप आणि हेवलॉक आयलँडचे नामांतर स्वराज्य द्वीप म्हणजे बेट असे करण्यात आले आहे.


