Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

‘श्रध्देचा बाजार..!’ – ॲड. नकुल पार्सेकर यांचा डोळ्यांत अंजन घालणारा झणझणीत लेख.

 श्रध्देचा बाजार…..
मराठी माणूस हा फारचं श्रध्दाळू, पुजा-आर्चा, भजनं, किर्तन हा त्याच्या नेहमीच आत्मियतेचा विषय.! महाराष्ट्र ही संताची भूमी, तंत्रज्ञानाने जग कितीही पुढे गेल तरी महाराष्ट्रातील पुरोगामीत्व त्यांने कधीही सोडलेलं नाही. कमालीचं दारिद्र्य असलं तरी आपला प्रत्येक सण तो चेहऱ्यावर उसनं अवसानं आणून कितीही अडचणी असल्या तरी अगदी आनंदाने साजरा करतो.
महाराष्ट्रात गणेशोत्सव हा लोकमान्यांनी सुरू केला.त्या काळात त्यांनी तो ज्या उदात्त हेतुने आणि सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाने प्रेरीत होवून केला होता त्याला आज आपण सर्वार्थाने हरताळ फासलेला आहे. याचं पावित्र्य आणि हा सण साजरा करण्यासाठीचा मुळ संकल्पनाचं बासनात गुंडाळून फक्त देखावा आणि प्रदर्शन याचाचं स्विकार केला आहे. पुर्वीच्या काळी शिक्षणाचं माहेर घर असलेल आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीचा केंद्रबिंदू असलेल्या पुण्यनगरीत अनेक सामाजिक वा जेष्ठ साहित्यिकांचे विविध विषयांवर प्रबोधन करणारे परिसंवाद, चर्चासञं ठेवली जात असतं.. ज्यामध्ये समाजामध्ये सौहार्दाचे वातावरण टिकून राहण्यासाठी मदत व्हायची.. आजच्या परिस्थितीत समाजाचा विवेकचं हरवला आहे. त्यामुळे आज पुण्यात गुन्हेगारीने कळस गाठला. दिवसाढवळ्या टोळीयुद्ध सुरू आहेत. या टोळ्यांना पडद्यामागून राजकीय आश्रय असतो हे पण लपून राहिलेलं नाही.


महाराष्ट्रातील गणेशोत्सव, प्रत्येक मराठी माणसाचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. काही तुरळक अपवाद सोडल्यास घराघरात गणपती असतो. गणेशोत्सव काळात तर कोकणात गणपतीला जाण्यासाठी अर्धी मुंबई खाली होते. कोकणी माणूस ऋण काढून हा सण साजरा करतो. घरगुती गणपतीबरोबरचं सार्वजनिक गणेशोत्सवही असतात. अर्थात त्याचं स्वरूपही दिवसेंदिवस बदलतं चाललयं आणि बिघडतं चाललयं हे आता नाकारता येणार नाही.


मुंबईतील सर्व गणेशभक्तांच्या श्रध्देचा गणपती म्हणजे लालबागचा राजा. मुंबईतील कापडगिरण्या सुरु असताना या भागात हजारो मिल कामगारांचे वास्तव्य असलेलं हा भाग, बदलत्या परिस्थितीत हा वर्ग आता विस्थापित झाला. परिवर्तन अटळ असतं हे जरी खरं असलं तरीही जे परिवर्तन पर्यावरण आणि विशेषतः सामाजिक व धार्मिक पर्यावरण बिघडवतं अस परिवर्तन काय कामाच?
या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनचं नव्हे तर देशभरातून लाखो गणेशभक्त येत असतात. दरवर्षी कोट्यवधी रूपयांचे दान रोख व वस्तुच्या रुपात जमत असत.. अर्थात त्याचा विनीयोग हा अनेक सामाजिक उपक्रमासाठी पारदर्शकपणे होतो अशी आजच्या परिस्थितीत आपण समजून घेणे थोडं धाडसाचे होईल. मात्र खेद या गोष्टीचा आहे की चार दिवसापूर्वी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गोंधळ आणि ढकलाढकली व मारामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला ते पाहून एक गणेशभक्त म्हणून मन खिन्न झाल. अशा पद्धतीने जर गणेशदर्शन होत असेल तर गणेशभक्ताना माझी विनंती आहे की तुम्ही लालबागच्या राजाला घराकडूनचं नमस्कार करा. देवाला कुठूनही नमस्कार केला तर तो पावतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे देवाकडे सर्व समान असतात. जे समतेच तत्वं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानात सांगितले ते फक्त संविधानातचं राहिलं. देवासमोर जर सगळे समान आहेत तर सामान्य गणेशभक्ताना अतिशय प्रतिकुल परिस्थितीत दर्शन आणि राजकीय नेते, कार्यकर्ते, सेलिब्रिटी, उद्योगपती यानां लाल कार्पेट घालून अगदी सहजपणे विशेष व्यवस्था का ❓हा दुजाभाव राजकारणात करा पण त्या लालबागच्या राजाच्या दरबारात का ❓कुणी काहीही म्हणा पण दिवसेंदिवस श्रध्देच्या या बाजारात अनेक वेगळा उद्देश घेऊन कार्यरत असलेल्या व्यापाऱ्यांनी श्रध्देचा बाजार मांडलाय हे नाकारून चालणार नाही.
– ॲड. नकुल पार्सेकर (सावंतवाडी)
मोबा. 77987 13475

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles