सावंतवाडी : देशाच्या स्वातंत्र्यानंतर राज्यकारभारासाठी एक लिखित घटना देशाला अभिप्रेत होती. त्या घटनेची सर्वस्वी जबाबदारी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात आली. त्यांनी अविरत कष्ट करून ती पूर्ण केली. ज्या घटनेत जगातील सर्वोच्च कलमांचाही समावेश करण्यात आला. या संविधानामुळेच आपला देश अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ असूनही सर्वांना न्याय, समता, बंधुता आणि एकता यामध्ये एकसंघ गुंफण्यात आले आहे. म्हणूनच संविधान हाच प्रत्येक भारतीयासाठी अनमोल ग्रंथ असल्याने संविधानाचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन ॲड. मनीष मोहन जाधव यांनी येथे केले.

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर सभागृहात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ॲड. जाधव प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला विभागाच्या अध्यक्षा मीनाक्षी तेंडुलकर होत्या.
प्रारंभी ॲड. मनीष जाधव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या अर्ध पुतळ्याला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बुद्ध वंदना, त्रिशरण झाल्यानंतर प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

दरम्यान यावेळी ॲड. मनीष जाधव पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना जगातील कोणकोणत्या देशांचा अभ्यास केला?, त्याचबरोबर भारतातील विविध धर्म, संस्कृती व परंपरा तसेच येथील विविध समाज रचना आणि पद्धतींचा अभ्यास करून तशा पद्धतीने सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. हे सांगून भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारतात संविधान दिन सर्वप्रथम ई. झेड. खोब्रागडे या सनदी अधिकाऱ्यानी नागपूरमध्ये २००५ मध्ये सर्वप्रथम हा दिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे खोब्रागडे हेच संविधान दिन साजरा करणारे प्रथम व्यक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर संपूर्ण भारतात 2015 पासून हा दिन मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमाने साजरा होत असल्याचे त्यांनी सांगून हा दिवस औपचारिकरित्या साजरा न करता सर्वप्रथम संविधान प्रत्येकाने अभ्यासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगून संविधान प्रत्यक्षात आचरणात आणणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संविधान हे केवळ पुस्तक नसून प्रत्येक भारतीयांचे ते अनमोल स्वप्नच आहे, हे त्यांनी स्पष्ट केले
संविधान दिनानिमित्त आपण सर्वांनी संविधानाच्या मूल्यांना ,लोकशाहीला, आणि कायद्याच्या राज्याला बळकटी देण्याची प्रतिज्ञा करूया आणि वचनबद्ध होऊया, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना मीनाक्षी तेंडुलकर यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आपणाला दिलेली मूल्य प्रत्येकाने अंगीकार करून संविधान प्रेमींनीच नव्हे तर देशातील सर्वधर्मियांनी संविधानाची रक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी मुख्याध्यापक विलास कासकर, सुनील जाधव, मीनल जाधव यांनीही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा जाधव यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रशेखर जाधव यांनी केले. आभार गौतमी कांबळी यांनी मानले. यावेळी तालुक्यातील संविधान प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


