सावंतवाडी : सावंतवाडी तहसील कार्यालयाच्या भरारी पथकाने रविवारी रात्री धडक कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सहा डंपरवर कारवाई केली. या कारवाईत सहाही वाहने जप्त करण्यात आली असून, याबाबतची सविस्तर माहिती महसूल विभागाने दिली आहे.
वेत्ये-सोनुर्ली रस्त्यावर पकडले ५ डंपर –

या कारवाईबाबत अधिक तपशील असा की, रविवार दिनांक ७ डिसेंबर रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास भरारी पथक गस्त घालत असताना, त्यांनी बांद्यावरून वेत्येच्या दिशेने प्रवास केला. वेत्ये तिठा चॉकलेट फॅक्टरी येथून सोनुर्लीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या खरोबा देवस्थानाच्या शेजारील मोकळ्या जागेत ५ डंपर उभे असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानुसार, भरारी पथकाने त्वरित हे ५ डंपर जप्त करण्याची कारवाई केली.

कोलगाव तिठा येथे ६ वा डंपर जप्त –
या कारवाईनंतर, भरारी पथकाने आपली गस्त पुढे सुरू ठेवली असता, आणखी एक डंपर कोलगाव तिठा येथे अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आले. अशा प्रकारे, एका रात्रीत एकूण सहा डंपरवर कारवाई करण्यात आली आहे.
सदर यशस्वी कारवाई भरारी पथक प्रमुख तथा सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात किरण लक्ष्मण गजीनकर (ग्राम महसुल अधिकारी, सावंतवाडी ग्रामीण), प्रदीप प्रकाश बर्गे (ग्राम महसुल अधिकारी, तिरोडा), महेश लटपटे (ग्राम महसुल अधिकारी, गाळेल), दिनेश दिलीप पेडणेकर (महसुल सेवक, तळवणे), धीरज रमेश गावडे (महसुल सेवक, तळवडे) आणि तुषार भालचंद्र सावंत (महसुल सेवक, निगुडे) यांचा समावेश होता.


