नाशिक : नाशिक येथील सामनगाव येथे राहणाऱ्या 10 वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण राज्य हादरुन गेले आहे. मुलीने फाशी घेत स्वत:ला संपवले. आता नेमकं काय झालं? याचा तपास पोलीस करत आहेत. घटना घडली तेव्हा मुलीचे आई-वडील मजुरी करण्यासाठी गेले होते.
नाशिक तालुक्यातील सामनगाव येथे राहणारी १० वर्षांची मुलगी घरी एकटीच होती. तिचे आई-बाबा रोजंदारी मजुरीसाठी गेले होते. त्याचवेळी तिने घरातल्या नायलॉनच्या दोरीने छताला गळफास लावून घेतला. परत आलेल्या नातेवाईकांनी तिला बेशुद्धावस्थेत पाहिले आणि तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, नंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलीसांना देण्यात आली.
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट –
पोलिसांनी सांगितले की, मुलीने आत्महत्या का केली याचे अद्याप कोणतेही स्पष्ट कारण समोर आलेले नाही. सुसाईड नोट सापडलेली नाही आणि कुटुंबीयांनीही कोणत्या मानसिक तणावाची किंवा वादाची माहिती दिलेली नाही. नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने संपूर्ण सामनगाव हादरले असून, एवढ्या चिमुकलीने असा निर्णय का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.


