सावंतवाडी : माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा तसेच युवा रक्तदाता संघटना यांच्या मागणीमुळे आमदार केसरकर यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान दिल्ली येथे 4 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या पत्रानुसार व केलेल्या पाठपुराव्यानुसार मोठे यश मिळाले आहे. सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात धारगळ येथील आयुर्वेद संस्थानाचे केंद्र सुरू करण्यात येणार असून या ठिकाणी रुग्णांना मोफत औषधोपचार केला जाणार आहे. तसा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करून दिल्ली येथील वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. यावर नक्कीच सकारात्मक विचार होईल, असे प्रतिपादन आयुर्वेदिक संस्थानाचे संचालक डॉ. प्रजापती यांनी केले आहे. आज आयुर्वेद संस्थानचे संचालक श्री. प्रजापती यांनी याबाबत अधिक माहिती दिली. आयुर्वेद संस्थानच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत डॉ. सुजाता कदम, डॉ. विनायक चकोर आदि उपस्थित होते.


दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे येथील रुग्णांना सिंधुदुर्गातच सेवा मिळावी, यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लवकरच आपल्या संस्थानचे उपकेंद्र सुरू करण्याचा मानस आहे. यात डॉक्टर, फार्मासिस्ट, व अन्य कर्मचारी यांच्या नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे करार करून हे केंद्र लवकरच सुरू केले जाईल. मात्र त्यासाठी थोडा अवधी लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला हे मोठे यश मिळाले असून येथील रुग्णांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. यासाठी आमदार दीपक केसरकर तसेच युवा रक्तदाता संघटनाचे संस्थापक अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून धारगळ येथील संस्थानात कार्यरत असलेले भूमिपुत्र पंचकर्म थेरपीस्ट तथा शिवसेना शाखाप्रमुख गौरव कुडाळकर यांनीही वेळोवेळी आपल्या पद्धतीने सदर सातत्यपूर्ण पाठपुरावा आयुर्वेद संस्थान या ठिकाणी केला आहे.


