न्यू चंडीगड : आगामी टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला अवघे 8 सामने बाकी असताना टीम इंडियाने घोर निराशा केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात 214 धावांचा पाठलाग करताना अपवाद वगळता टीम इंडियाच्या फलंदाजांनी घोर निराशा केली. भारताला दक्षिण आफ्रिकेसमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला 19.1 ओव्हरमध्ये 162 रन्सवर ऑलआऊट केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आणि पहिल्या पराभवाची अचूक परतफेड केली. तसेच टीम इंडियाचा हा विजयी धावांचा पाठलाग करताना दुसरा सर्वात मोठा पराभव ठरला.
टीम इंडियाची फ्लॉप सुरुवात –
उपकर्णधार शुबमन गिल याने पुन्हा निराशा केली. शुबमन त्याच्या डावातील पहिल्याच बॉलवर आऊट झाला. अभिषेक शर्मा याला चांगली सुरुवात मिळाली. मात्र अभिषेकनेही निराशा केली. अभिषेकने 17 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कॅप्टन सूर्यकुमार यादव यानेही चाहत्यांना निराश केलं. सूर्या 5 धावांवर बाद झाला. तिसऱ्या स्थानी पहिल्यांदाच बॅटिंगसाठी आलेल्या अक्षर पटेल याला मस्त सुरुवात मिळाली. मात्र अक्षरला धावांच्या गरजेनुसार वेगात फटकेबाजी करता आली नाही. अक्षर 21 बॉलमध्ये 21 रन्स करुन आऊट झाला. अक्षर आऊट झाल्याने टीम इंडियाची स्थिती 7.3 ओव्हरमध्ये 4 आऊट 67 अशी झाली.
पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी –
हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा या जोडीने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे विजयाच्या आशा होत्या. मात्र ही जोडी फुटताच टीम इंडियाच्या विजयाची शक्यता कमी झाली. हार्दिक आऊट होताच ही जोडी फुटली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 51 रन्स जोडल्या. हार्दिकने 20 रन्स केल्या. तिलक वर्मा आणि जितेश शर्मा या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 21 बॉलमध्ये 39 रन्स जोडल्या. जितेशने 17 चेंडूत 27 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर ओटनील बार्टमॅन याने 19 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला 3 झटके दिले. ओटनील याने शिवम दुबे, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती या तिघांना आऊट केलं. तर तिलक वर्मा याच्या रुपात टीम इंडियाने दहावी आणि शेवटची विकेट गमावली आणि दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेसाठी ओटनील बार्टमॅन याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर लुंगी एन्गिडी, मार्को यान्सेन आणि लुथो सिपामला या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या.


