बांदा : येथील नट वाचनालयात (कै.) शशिकांत नाडकर्णी पुरस्कृत त्यांचे वडील (कै.) शांताराम नाडकर्णी व त्यांची आई (कै.) शांताबाई नाडकर्णी यांचे स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात अस्मि मांजरेकर (आरपीडी हायस्कुल, सावंतवाडी) तर लहान गटात भक्ती केळुस्कर (माध्यमिक विद्यालय, इन्सुली) या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेला दोन्ही गटात स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
सदर स्पर्धा ५वी ते ७वी व इ. ८ वी ते १०वी अशा दोन गटात घेण्यात आली. इ.५वी ते ७वी साठी वाचनाचे महत्व व माझा आवडता संशोधक व इ. ८ वी ते १०वी साठी माझा आवडता कवी व व्यायामाचे महत्व हे विषय देण्यात आले होते. या दोन्ही गटात एकूण २२ स्पर्धक सहभागी झाले होते.
इ.५वी ते ७वीच्या गटात द्वितीय क्रमांक दुर्वा नाईक (माध्यमिक विद्यालय, इन्सुली), तृतीय क्रमांक दुर्वा नार्वेकर (मळगाव हायस्कुल) हीने मिळवला. तर उत्तेजनार्थ क्रमांक सर्वेक्षा ढेकळे (यशवंतराव भोसले प्रशाला, सावंतवाडी) व पार्थ सावंत (आर.पी.डी. हायस्कूल, सावंतवाडी) यांना देण्यात आला.
इ.८ वी ते १०वी च्या गटात द्वितीय क्रमांक मृणाली पवार (आर.पी.डी. हायस्कूल, सावंतवाडी), तृतीय क्रमांक दिव्यल गावडे (नूतन माध्य. विद्यालय, इन्सुली) हीला देण्यात आला. तर उत्तेजनार्थ क्रमांक मृदुला सावंत (दिव्यज्योती इंग्लिश स्कूल, बांदा) व वैभवी परब (मळगाव हायस्कुल) यांना देण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिस व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत सावंत यांनी केले.

तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन करून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सदस्या सौ. स्वप्निता सावंत, गुरुनाथ नार्वेकर, चंद्रकांत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन केल्यावर सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.
या कार्यक्रमाला वाचनालयाचे सदस्य शंकर नार्वेकर, जगन्नाथ सातोस्कर, तसेच प्रशालेचे शिक्षक श्री. सावळ, घारपी शाळेचे मुख्याध्यापक जे. डी. पाटील, शिक्षिका सौ. अर्चना देसाई, सौ.शुभेच्छा सावंत, तसेच पालक, विद्यार्थी यांच्यासह वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, लिपिक ओंकार राऊळ व शिपाई सौ. अमिता परब उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार सचिव राकेश केसरकर यांनी मानले.


