सावंतवाडी : पद्मनाभ शिष्य सांप्रदाय, तपोभूमी, कुंडई (गोवा) यांच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘तपोभूमी दिनदर्शिका २०२६’ चे अनावरण सावंतवाडी येथील तालुका पत्रकार कक्षामध्ये सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना रेडकर यांनी, तपोभूमीचे कार्य आणि पद्मनाभ शिष्य सांप्रदायाचे सामाजिक व अध्यात्मिक योगदान महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
या प्रकाशन सोहळ्याला सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष हर्षवर्धन धारणकर, सह सचिव विनायक गांवस, माजी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार व विजय देसाई, तसेच जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, नरेंद्र देशपांडे, रुपेश हिराप आणि पराग मडकईकर यांचा समावेश होता. पद्मनाभ शिष्य सांप्रदायिक प्रतिनिधी म्हणून देविदास आडारकर यांनी दिनदर्शिकेच्या प्रकाशनाबद्दल माहिती दिली.
तपोभूमी, कुंडई (गोवा) ही महाराष्ट्रासह गोव्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, या दिनदर्शिकेद्वारे वर्षभर आध्यात्मिक कार्यक्रमांची माहिती भाविकांना उपलब्ध होणार आहे. सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या सहकार्याबद्दल पद्मनाभ शिष्य सांप्रदायाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.


