सावंतवाडी: तालुक्यातील मळगाव–वेत्ये गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर महावितरणच्या वीज खांबाला लागून उभा असलेला मोठा वृक्ष सध्या धोकादायक अवस्थेत असून, तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर वृक्ष वीज खांबावर झुकलेला असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचा तसेच मोठ्या अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ व वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. सदर वृक्ष कोसळल्यास जीवितहानीसह वीज वितरणच्या मालमत्तेचेही नुकसान होऊ शकते. त्यामुळे संबंधित धोकादायक वृक्ष तातडीने तोडण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ व वाहनधारकांकडून होत आहे.
महावितरण व संबंधित विभागांनी याची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


