सावंतवाडी : माणुसकीला काळीमा फासणारी घटना सावंतवाडी तालुक्यातील एका गावात घडली आहे. अत्यंत लाजिरवाना हा प्रकार घडला आहे. एका पाच वर्षीय चिमुकलीवर ४५ वर्षाच्या तरुणाने स्वच्छतागृहात जावून अत्याचार केला आहे. दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. आज त्या चिमुरडीने आईला माहिती दिल्यानंतर डॉक्टरच्या तपासणीनंतर हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान याबाबतची माहिती संबंधित नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या संशयिताला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी, तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. संबंधित मुलगी ही अंगणवाडीमध्ये शिकत होती. स्वच्छतागृहात गेल्याची संधी साधून त्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने त्या ठिकाणी गुपचूप जात त्या मुलीवर अत्याचार केला. दरम्यान दोन दिवस पोटात असाह्य होऊन दुखत आहे, असे सांगून ती रडत होती. ती नाहक रडते, असे वाटल्यामुळे आईने तिला मारहाण केली. मात्र डॉक्टरकडे जाऊन तिची तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे पुढे आले. याबाबतची माहिती संबंधित डॉक्टरने सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार तात्काळ संबंधित मुलीच्या आई-वडिलांची तक्रार घेऊन त्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


