Friday, December 19, 2025

Buy now

spot_img

‘राष्ट्रीय शिल्पकाराचे महानिर्वाण !’ – महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्लीचे संचालक हेमराज बागुल यांची शिल्पयोगी राम सुतार यांना भावपूर्ण शब्दांजली!

राष्ट्रीय शिल्पकाराचे महानिर्वाण !

जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांची गेल्याच महिन्यात भेट झालेली. ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराच्या निमित्ताने नोएडा येथील निवासस्थानी त्यांना भेटलो होतो. आयुष्याची शताब्दी पूर्ण केलेला हा थोर शिल्पकार त्यावेळी अंथरुणावर खिळलेला असला तरी त्यांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर जगण्याचे साफल्य मात्र पुरेपूर विलसत असलेले. अफाट सृजन प्रसवणारे त्यांचे ते श्रेष्ठ हात त्यावेळी मी अतीव प्रेमादराने कुरवाळले होते. आज महिनाभराने अंतिम निरोप देताना त्यांच्या पार्थिवासमोर उभे राहून मी भावनावशतेने हात जोडले. गोंदूर या धुळ्याजवळच्या छोट्या खेडेगावातील सामान्य बलुतेदार कुटुंबातून सुरू झालेल्या त्यांच्या जीवन प्रवासाचा समारोप आज देशाच्या राजधानीत झाला.

जगातील सर्वात उंच पुतळा साकारणाऱ्या श्री. सुतार यांनी भारतीय संस्कृतीतील काळाच्या विविध टप्प्यातील सर्वच नायकांसह जवळपास सर्वच महापुरुषांची शिल्पं साकारली आहेत. अगदी श्रीराम-कृष्णापासून तर मध्यम युगातील साधुसंतांसह आधुनिक काळातील राष्ट्रपुरुषांपर्यंत. देशातील प्रमुख शहरांसह जगातील अनेक देशांमध्ये त्यांची शिल्पे अभिमानाने उभी आहेत. त्यांच्या या श्रेष्ठ अभिव्यक्तीने अनेक भारतीयच नव्हे तर परदेशी राष्ट्रप्रमुखही भारावलेले!

वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी शाळेतल्या शिक्षकांना गणपतीची मूर्ती करून देण्यातून श्री सुतार यांच्या कलेच्या प्रवासाचा जणू श्री गणेशा झाला. तो तब्बल 90 वर्षे अव्याहतपणे सुरूच राहिला. इतकी प्रदीर्घ कलासाधना करणारे श्री सुतार जगातील एकमेव कलावंत असावेत ! प्राथमिक शाळेत असतानाच त्यांच्यातला कलाकार जाणवलेला. एकदा काळ्या साबणातून त्यांनी साकारलेला विंचू पाहून शाळेतल्या साऱ्या पोरांसोबत शिक्षकही दचकले होते !

शालेय शिक्षणानंतरच्या दिवसात घडवलेल्या गांधीजींच्या चार फुटी पुतळ्यातून मिळालेल्या पैशातून त्यांनी ‘जेजे’तीलआपले कला शिक्षण सुरु केले. खळाळून हसणाऱ्या मुद्रेतील बिना चष्म्याच्या अन् बिना काठीच्या महात्मा गांधींचा हा पुतळा खरोखरच आगळावेगळा आहे. अशा स्वरूपाचा तो एकमेव पुतळा असावा. आपल्याकडे सर्व महापुरुषांचे पुतळे एका पारंपरिक साच्यात फिट झालेले आहेत. इतके कि त्याशिवाय ते ओळखूच येत नाही. मग चेहरा कसाही असला तरी केवळ त्यांच्या रुढ झालेल्या चिरपरिचित पोझमुळे अनेक महापुरुषांचे पुतळे ओळखले जातात. या पार्श्वभूमीवर एका छोट्या खेडेगावातील अवघ्या विशीतल्या तरुणाने साकारलेला हा पुतळा खरोखरच त्यांच्या कलेच्या असामान्यत्वाची प्रचिती देणारा आहे !

धुळयाच्या अध्यापक विद्यालयात कलाशिक्षक असणाऱ्या जोशी गुरुजींनी सुतारांची प्रतिभा ओळखून कला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. श्री. सुतार यांची कारकीर्द घडवण्यात जोशी गुरुजींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. सुतारांनीही त्याची कृतज्ञ जाणीव आयुष्यभर ठेवली. नोकरीला लागल्यानंतर मिळणाऱ्या दीडशे रुपये पगारातून श्री. सुतार त्यांना दरमहा पन्नास रुपये पाठवत !
औपचारिक शिक्षण घेण्याआधीच श्री. सुतार यांच्यातील उपजत प्रतिभा पाहून स्तिमित झालेल्या प्रख्यात जे जे स्कूल ऑफ आर्ट्सने त्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला ! अगदी शिक्षण घेतानाच त्यांच्या कलाकृतींवर अविश्वास घेण्याचेही प्रसंग घडले. मात्र अंतिमतः प्रतिष्ठेच्या मेयो सुवर्णपदकाचे मानकरी ठरल्यानंतर एक ‘लीजंड स्टुडन्ट’ म्हणून श्री. सुतार यांची ‘जेजे’च्या इतिहासात नोंद झाली !

शिक्षण झाल्यानंतर पुरातत्त्व विभागात त्यांना नोकरी मिळाली. या नोकरीत त्यांनी अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांमधील अनेक शिल्पे पुनःस्थापित करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम केले. चार वर्षे ही नोकरी केल्यानंतर ते दिल्लीत माहिती व प्रसारण मंत्रालयात रुजू झाले. 1960 च्या दरम्यान त्यांनी मध्यप्रदेशातील चंबळ नदीवरील गांधीसागर जलाशयात तब्बल 45 फूट उंचीचे भव्य शिल्प कोरून उभारले.त्यासाठी तब्बल दीड वर्षे ते प्रकल्पस्थळी वास्तव्यास होते. प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आलेले तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तर हे भव्य अन् देखणे शिल्प पाहून प्रचंड भारावले. त्यांनी श्री सुतार यांना पंजाबमधील भाक्रा – नांगल येथील प्रसिद्ध प्रकल्पात श्रमिकांचे ५० फुटांचे भव्य शिल्प ( Triamph Of Labour) उभारण्याची सूचना केली.

गांधीसागर येथील शिल्पानंतर श्री सुतार यांना राष्ट्रीय स्तरावर लौकिक प्राप्त झाला. मग ते नोकरी सोडून पूर्णवेळ शिल्पकलेकडे वळले. देशाच्या राजधानीत अनेक भव्य पुतळे त्यांनी उभारले. महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी संसदेच्या आवारात साकारलेले ‘महात्मा इन मेडिटेशन ‘ ( ध्यानस्थ महात्मा ) हे त्यांच्या कारकीर्दीला राजमान्यता देणारे शिल्प. या शिल्पाच्या प्रतिकृती भारत सरकारने अनेक देशांना पाठवल्यानंतर त्यांची जगभरातून प्रशंसा झाली ! हसऱ्या महात्म्याच्या निर्मितीपासून सुरू झालेला त्यांचा व्यावसायिक प्रवास ध्यानस्थ महात्म्याच्या निर्मितीच्या निमित्ताने एका अनोख्या टप्प्यावर पोहोचला ! त्यानंतर केंद्र सरकारने त्यांची भारतीय नेत्यांची शिल्प उभारण्यासाठी अधिकृत शिल्पकार म्हणून नेमणूक केली. प्रारंभी दिल्लीतील प्रस्थापित लॉबीशी सुतारांना मोठा संघर्ष करावा लागला. शांत सोज्वळ स्वभावाच्या सुतारांना त्रासही दिला गेला. मात्र आज देशाच्या राजधानीत सर्वत्र सुतारांनी घडवलेले पुतळे पाहताना त्यांचं निर्विवाद सिद्ध होणं प्रकर्षाने जाणवते !

राम सुतार केवळ विविध मुद्रेतील छायाचित्रे बघून महापुरुषांचा पुतळा तयार करत नाहीत. एखाद्या व्यक्तिरेखेत शिरणे काय असते ते त्यांच्याकडे पाहिल्यावर कळते. पुतळे तयार करताना त्यांनी अनेक महापुरुषांच्या चरित्राची पारायणे केलीत. चेहरा आणि शरीरयष्टीच्या पलीकडे जाऊन त्यांनी या महापुरुषांच्या अंतरंगाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आणि या महापुरुषांचे अंतस्थ तेज त्यांच्या पुतळ्यात ओतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजा रणजितसिंह यांचे पुतळे या दृष्टीने अत्यंत उल्लेखनीय आहेत. कला आणि कामावरची त्यांची निष्ठा तर कल्पनेपलीकडची. एकदा दोन दिवस सुतार घरी आले नाहीत म्हणून कुटुंबीयांनी काळजीने पोलिसांची मदत घेतली. पोलीस शोध घेत त्यांच्या स्टुडिओत पोहोचले तेव्हा त्यांना दिसले ते देहभान विसरून कामात तल्लीन झालेले राम सुतार ! एकदा तर भव्य पुतळ्याचे काम करताना शिडीवरून पडून त्यांचा हात मोडला. त्याही अवस्थेत एका हाताला प्लास्टर बांधून सुतारांनी पुतळ्याचे काम पूर्ण केले !
सृष्टीतील प्रत्येक गोष्टीत ते एखादा सजीव चेहरा शोधतात. एका जन्मजात अस्सल कलाकाराची नजर कशी असते ते सुतारांकडे पाहून कळते. असंख्य छोट्या वस्तुंमधून त्यांनी शिल्पे साकारली आहेत. अगदी पिस्ते वा भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या तरी टाकलेल्या टरफलांमध्ये ते सहजपणे कोरीव काम करून एखादा चेहरा साकारतात ! श्री. सुतार हे माणूस म्हणून अत्यंत साधे , निरलस आणि व्रतस्थ व्यक्तिमत्त्वाचे. श्रेष्ठ साहित्यिक पद्मश्री बा. भ. बोरकरांनी आपल्या दिल्लीतील वास्तव्यादरम्यान सुतारांवर ‘माझा मित्र’ या शीर्षकाने चक्क कविता लिहिलेली !

‘आनंद’मधल्या बाबू मोशायच्या शब्दात सांगायचं झालं तर श्री. सुतार यांची जिंदगी ‘लंबी’ आणि ‘बडी’ तर ठरलीच पण त्यांनी घडवलेल्या पुतळ्याच्या रूपाने ती अफाट उंचही ठरली आहे !

  • हेमराज बागुल
  • (संचालक – महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली) 

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles