कोल्हापूर : गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढत असतानाच आता कोल्हापूरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात चांदीचा व्यापार करणाऱ्या एका व्यावसायिकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे असे या व्यापाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे कोल्हापूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी ब्रह्मनाथ सुकुमार हालोंढे यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तपासाला सुरुवात केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, चोरीच्या उद्देशानेच ब्रह्मनाथ यांची हत्या झाली असावी. कारण ब्रह्मनाथ हालोंढे यांच्या हत्येनंतर त्यांच्याकडील 25 किलो चांदी चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून तातडीने तपास सुरु केला आहे. सध्या हुपरी आणि गोकुळ शिरगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलिसांकडून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्यामुळे आता या चौकशीतून काय निष्पन्न होणार आणि ब्रह्मनाथ हालोंढे यांचा मारेकरी सापडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


