सावंतवाडी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सावंतवाडी संस्थानला १९३२ या वर्षी दिलेल्या भेटीला यावर्षी ९२ वर्षे पूर्ण होत असल्याने डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या सुंदरवाडीच्या पुण्यभूमीत समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीच्या वतीने “डॉ.आंबेडकर भेट वारसा स्मृती प्रबोधन जागर- २०२४” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एका न्यायालयीन खटल्याच्या कामी तत्कालीन राजे श्रीमंत बापूसाहेब महाराज यांच्या न्यायालयासमोर उपस्थित राहून खोती आंदोलनातील आरोपीची बाजू सक्षमपणे मांडली होती. यादरम्यान खटल्याच्या शेवटच्या दिवशी सर्व समाजाचा संयुक्त भव्य मेळावाही याठिकाणी घेतला होता. या ऐतिहासिक भेटीच्या व मेळाव्याच्या स्मृतिप्रित्यर्थ सावंतवाडी नगरपरिषदेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान उभारून या स्मृतीला कायमस्वरूपी उजाळा दिला आहे.
या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील काही आंबेडकर अनुयायांनी एकत्र येत समता प्रेरणाभूमी संवर्धन समितीची स्थापना केली असून त्यामार्फत गेली काही वर्षे विविध सेवाभावी व समाजजागृतीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत .याच पार्श्वभूमीवर येत्या रविवार दिनांक २० ऑक्टोबर २०२४ रोजी समता प्रेरणाभूमी येथे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्याना )” स्मृती प्रबोधन जागर- २०२४ ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.३० वाजता नगर परिषदेचे मुख्याधिकारी, सागर साळुंखे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार असून या कार्यक्रमाला गोवा मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ.उल्हास चांदेलकर, सुप्रसिद्ध चित्रपट कलावंत, नंदू पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी राज्यातील प्रसिद्ध विचारवंत प्रा.डॉ .आनंद कासले हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार असून ते “संविधान समजून घेताना.. “या विषयावर मांडणी करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दीपक पडेलकर हे असून या सकाळच्या प्रथम सत्रात स्मृती प्रबोधन जागर हा कार्यक्रम तर दुपारच्या सत्रात प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम “जागर क्रांतीचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.याशिवाय दि.२२ तारीखलाही एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन निमंत्रक तथा समता प्रेरणाभूमी समितीचे सचिव मोहन जाधव व अन्य पदाधिकारी यांनी केले आहे.


