सावंतवाडी : निवडणूक आली की नारायण राणेसाहेबांच्या आशीर्वादाने आमदारकी मिळालेले दलबदलू नेते कपडे बदलावे तसे पक्षप्रवेश घेण्यासाठी दारोदार भटकंती करत आहेत. दोनदा झालेल्या पराभवानंतर उमेदवारी मिळणार नाही, याची खात्री पटल्यानेच उठसुठ मंत्री दीपक केसरकर यांच्यावर ते टीका करत आहेत. भाजपच्या नेत्यांनी कणकवलीच्या या संजय राऊतना वेळीच आवर घालावा व महायुतीतील मिठाचा खडा बाजूला सारावा, असे आवाहन युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रतिक बांदेकर व शहरप्रमुख अर्चित पोकळे यांनी केले आहे.
”उठा राजन, निवडणूक आली. पक्ष सोडायची वेळ झाली !” अशी परिस्थिती या उपऱ्या लोकांची आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपकभाई केसरकर यांच्यावर उठसूठ नाहक आरोप व बदनामी करत स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम ते करत आहेत. त्यांना कळून चुकले आहे की त्यांचे इकडे काही काम नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचे नाव वेंगुर्ला मतदार यादीत नोंद केले आहे. येणाऱ्या काळात आपल्या मुलाला ते वेंगुर्ला नगरपरिषदमधून उतरवतील. तसेच महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याची सुपारी त्यांनी घेतली आहे. पक्षातून हकालपट्टी व्हावी व संभाव्य पक्षप्रवेशाची संधी मिळावी यासाठी दलबदलू नेत्यांची ही धडपड सुरू आहे. त्यामुळे सावंतवाडीत आलेल्या या संजय राऊतना भाजपने वेळीच आवर घालून महायुतीमधला मिठाचा खडा बाजुला सारावा असे आवाहन श्री. बांदेकर व श्री. पोकळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.