सावंतवाडी : मळगावचे सरपंच श्री. हनुमंत पेडणेकर यांच्यावर विरोधी सदस्यांनी दाखल करण्यात आलेला अविश्वासाचा ठराव फेल गेल्यानंतर मळगाव गावच्या सरपंचपदी श्री.पेडणेकर हे कायम राहणार असल्याचे सिद्ध झाले.
दरम्यान अविश्वासाचा ठराव दाखल करणारे विरोधकचं ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहील्याने गावात वेगळीचं चर्चा सुरू झाली आहे. याबाबत मळगाव गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा मळगाव ग्रामस्थ श्री.पांडुरंग राऊळ यांनी गावातील अंतर्गत राजकारणावर भाष्य केले आहे.
श्री. राऊळ यांनी यावर असे म्हटले आहे की, मळगाव गावच्या सरपंचावर अविश्वास दाखल होणे हे गावासाठी भूषणावह नाही, सरपंचाचे नाव खराब होणे म्हणजे गावचे नाव खराब होण्यासारखे आहे, ज्यावेळी गावात स्ट्रीट लाईट वरुन मोठे आंदोलन करण्यात आले त्यानंतर गावातील सरपंचासह सत्ताधारी तसेच विरोधी सदस्य एकञ मिळून ग्रामस्थांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी एकञ आले होते आणि गेल्या शुक्रवारी माञ विरोधी सदस्यांनी सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करुन ग्रामस्थांमध्ये विरोधाभास निर्माण केले आहे.
अशी कोणती गोष्ट घडली की ज्यामुळे विरोधी सदस्यांना सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करावा लागला असा प्रश्न श्री. पांडुरंग राऊळ यांनी विचारला आहे.
दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये मिलीभगत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
श्री.राऊळ पुढे म्हणाले की,
अंतर्गत वादामुळे रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गरजांच्या समस्या गावात जैसे थे असून यामुळे गाव इतर गावांच्या तुलनेने दहा वर्षे मागे राहीला आहे. ग्रामपंचायतीचा करोडो रुपयांचा निधी खर्च होत नसून जिल्ह्यात कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये लिपीकाला देण्यात येणाऱ्या पगारापेक्षा मळगाव ग्रामपंचायत मधील लिपीकाचा पगार हा मनमानीपणे वाढवून जास्त देण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे, फक्त पदासाठी सत्ताधारी आणि विरोधी सदस्य भांडत आहेत हे गावचे दुर्देव आहे. तसेच सत्ताधारी व विरोधी यांच्या वरिष्ठांनी एकञितपणे बैठक घेऊन अंतर्गत वाद निकाली काढून गावाच्या विकासासाठी योग्य ते प्रयत्न करणे आवश्यक आहे अशी विनंती श्री.राऊळ यांनी दोन्ही पक्षांच्या वरीष्ठ नेत्यांकडे केली.
तसेच ग्रामपंचायतचा कारभार मनमानीपणे सुरु असून ग्रामसभेला महत्त्व दिले जात नाही आहे याबाबतचे आवश्यक पुरावे कागदपत्रे गटविकास अधिकाऱ्यांना ग्रामस्थांमार्फत देण्यात आले आहेत.
दरम्यान दोन्ही बाजुचे सदस्य सत्तेसाठी व सरपंचपदासाठी भांडत आहेत, त्यांना गावच्या विकासाचे देणे घेणे नसल्याचे बोलले जाते.
दोन्ही पक्षांच्या अंतर्गत वादामुळे व घाणेरड्या राजकारणामुळे गावाची वाईट अवस्था झाल्याचे खेदाने नमूद केले. तसेचं या अश्या राजकारणामुळे गावाचा विकास रखडला आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी भाजप व शिवसेना या पक्षांना विचारला आहे, यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी एकञितपणे बैठक घेण्यात यावी असे म्हटले.


