खळबळजनक! – जात विचारून अमानुष मारहाण, आरोपी मोकाटच का? ; अटकेची मागणी, अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चाचा इशारा!, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक नाही ; तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप.

सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती समाज बांधवांचा संतप्त इशारा!,  दोषींवर कठोर कारवाईची मागणी.

कणकवली : देवगड तालुक्यातील मुणगे येथे बौद्ध समाजातील एका तरुणाला जात विचारून जातीवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याचा गंभीर आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जाती समाज बांधवांनी केला आहे. आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर तीव्र आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा स्पष्ट इशारा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, देवगड तालुका सेवा संघाचे पदाधिकारी आनंद देवगडकर तसेच माजी नगरसेवक गौतम खोडकर यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

यावेळी महेंद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, आनंद जाधव, सुंदर जाधव, बाळकृष्ण चव्हाण, विश्वनाथ पडेलकर, देवदत्त कदम, गौतम खोडकर, दिलीप वाडेकर, सुभाष कदम, आनंद मोरे, सुशील कदम, विनोद कदम, विनायक तांबे, विनय मोरे, सूर्यकांत मोरे, तुषार जाधव, गौतम हिंदळेकर, शरद कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

“जात कोणती?” या प्रश्नानंतर सुरू झाला अत्याचाराचा थरार!

पत्रकार परिषदेत बोलताना अंकुश जाधव यांनी सांगितले की, कुडाळ तालुक्यातील कसाल येथील रोहित नारायण कदम हा तरुण मुणगे येथे बॅनर लावण्याचे मजुरीचे काम करत असताना काही जणांनी त्याला अडवून प्रथम त्याची जात विचारली. त्याने जात सांगताच त्याच्यावर जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. “तुम्ही खालच्या जातीचे लोक अशीच कामे करणार” अशा अपमानास्पद शब्दांत त्याला हिणवण्यात आले. त्यानंतर आणखी काही जणांना बोलावून त्याच्यावर मारहाण करण्यात आली आणि काम न करण्यासाठी दमदाटी करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

या घटनेमुळे रोहित कदम व त्याचे कुटुंब प्रचंड भीतीच्या छायेत असून, उपजीविकेचे साधन असलेले बॅनर लावण्याचे काम करण्यासही त्यांना भीती वाटत आहे. या कुटुंबावर बेरोजगारीची वेळ आणणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार की नाही? असा संतप्त सवाल जाधव यांनी उपस्थित केला.

“गुन्हा दाखल… पण आरोपी अजूनही मोकाट!”

या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांवर राजकीय दबाव आहे का, की त्यांनी स्वतःच दबाव स्वीकारला आहे? असा थेट सवालही पत्रकार परिषदेत उपस्थित करण्यात आला.

याशिवाय, पीडित कुटुंबावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला. आरोपी कोणत्याही जातीचे, पक्षाचे किंवा संघटनेचे असले तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तपासाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही आरोपींना अटक का होत नाही, याचे उत्तर पोलीस प्रशासनाने द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

पोलीस अधीक्षकांना निवेदन, अन्यथा आक्रोश मोर्चा!

या प्रकरणातील सर्व दोषींवर अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह लागू होणारी सर्व संबंधित कलमे लावून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. मागणीची दखल न घेतल्यास समाजाच्या वतीने देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

पीडित रोहित कदम यांचा आरोप –

यावेळी पीडित रोहित कदम यानेही आपली भूमिका मांडली. कामावर असताना काही जणांनी नाव व जात विचारून जातीवाचक शिवीगाळ केली, मारहाण केली तसेच त्याचा मोबाईलही फोडल्याचा आरोप त्याने केला. या प्रकरणात न्याय मिळावा आणि आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी त्याने केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles