सावंतवाडी : सावंतवाडी आगारातून ग्रामीण भागात धावणाऱ्या अनेक एसटी बसांची दयनीय अवस्था प्रवाशांच्या जिवाशी खेळणारी ठरत असल्याचा गंभीर आरोप करत, या भंगार बसा तात्काळ सेवेतून हटवून त्यांच्या जागी नव्या किंवा दुरुस्त बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सावंतवाडी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील अनेक एसटी बस अत्यंत जीर्ण अवस्थेत असून त्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बसांच्या छतांमधून पावसाचे पाणी गळते, खिडक्या व दरवाजे निकामी आहेत, आसनांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेक बसांमध्ये अग्निशामक यंत्रणा, फर्स्ट एड किट तसेच सामान ठेवण्याची सुरक्षित व्यवस्था नसल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काही बसांचे ब्रेक, क्लच व इतर यांत्रिक भागही धोकादायक स्थितीत असल्याने गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
याशिवाय सावंतवाडी आगारातून सुटणाऱ्या अनेक गाड्या वारंवार बिघाडामुळे नियोजित वेळेत धावत नसल्याने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आणि ग्रामीण भागातील हजारो प्रवाशांना दररोज मनस्ताप सहन करावा लागत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रवाशांच्या जीविताशी तडजोड करणाऱ्या या भंगार बसा तात्काळ सेवेतून बाजूला काढून त्यांच्या जागी नवीन अथवा दुरुस्त बस उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी करत, आठ दिवसांच्या आत ठोस निर्णय न घेतल्यास प्रवाशांच्या हितासाठी तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही जावेद खतीब यांनी एसटी प्रशासनाला दिला आहे.
तसेच, प्रवाशांच्या मागणीनुसार बांदा–चौकुळी एसटी बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणीही त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, या निवेदनाच्या प्रती विभाग नियंत्रक (रा.प. सिंधुदुर्ग), पोलीस निरीक्षक, बांदा आणि जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.



