पॅरिस : भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगाट हिने 50 किलो फ्रीस्टाइल गटात शानदार कामगिरी करताना अंतिम फेरी गाठली. विनेश फोगाटने क्युबाच्या युसनेलिस गुझमन लोपेझविरुद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. विनेश फोगाट ऑलिम्पिक कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू, तर सुशील कुमारनंतरची पहिली भारतीय ठरली. मात्र अंतिम सामन्याआधी एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगट रौप्य पदकासाठीही पात्र होणार नाही.
नेमकं काय घडलं?
विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा काहीसे जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.


