अभिनंदनीय! – पत्रकार नीलेश मोरजकर यांना ‘निर्भीड पत्रकारिता’ पुरस्कार प्रदान! ; मुंबई येथे आयोजित सोहळ्यात सन्मानित.

सावंतवाडी : निर्भीड, वस्तुनिष्ठ आणि समाजाभिमुख पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे बांदा येथील दैनिक ‘सकाळ’चे पत्रकार नीलेश मोरजकर यांना मुंबई येथे आयोजित शानदार सोहळ्यात ‘निर्भीड पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात आज झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांनी हा प्रतिष्ठेचा सन्मान स्वीकारला.

‘आर्यारवी एंटरटेनमेंट’तर्फे आयोजित ‘पत्रकार, मुक्त पत्रकार, संपादक, कला, साहित्य व समाजसेवक पुरस्कार सोहळा २०२६’ अंतर्गत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीडपणे कार्य करत सामाजिक प्रश्न, सर्वसामान्यांच्या समस्या आणि जनहिताच्या विषयांना प्रभावीपणे मांडल्याबद्दल श्री. मोरजकर यांची ‘निर्भीड पत्रकारिता’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. नीलेश मोरजकर यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून बांदा परिसरासह सावंतवाडी तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ज्वलंत प्रश्नांना प्रकाशझोतात आणले आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, रस्ते, वीज, एसटी सेवा, पर्यावरण, शेती, वन्यजीव संघर्ष तसेच सामान्य नागरिकांच्या न्याय्य प्रश्नांना त्यांनी सातत्याने वृत्तपत्रातून स्थान दिले. केवळ घटना मांडण्यापुरती पत्रकारिता मर्यादित न ठेवता, अनेक प्रश्नांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर दिला आहे.

सामाजिक बांधिलकी, वस्तुनिष्ठ वृत्तांकन आणि जनहिताच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत केलेल्या पत्रकारितेची राज्यस्तरावर दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईच्या व्यासपीठावर बांदा आणि सिंधुदुर्गच्या ग्रामीण पत्रकारितेचा गौरव झाल्याने हा सन्मान जिल्ह्याच्या पत्रकारिता क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरला आहे.

या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार तथा जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, प्रसिद्ध कवी व साहित्यिक अरुण म्हात्रे, साहित्याचार्य व संपादक पंढरीनाथ तामोरे, समाजसेवक वैभव कदम, अभिनेते व समाजसेवक गौरव पाटील यांच्यासह कला, साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. आयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या पुढाकारातून हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री मोरजकर यांनी हा सन्मान आपल्या पत्रकारितेवर विश्वास ठेवणारे वाचक, सहकारी, हितचिंतक आणि सर्वसामान्य जनतेला समर्पित केला. “पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील दुर्लक्षित घटकांचा आवाज बनण्याची जबाबदारी आहे. हा पुरस्कार आगामी काळात अधिक जबाबदारीने आणि निर्भीडपणे कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

नीलेश मोरजकर यांच्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल बांदा परिसरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार, सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles