सावंतवाडी : आज आपल्याला शाश्वत प्रगती साधायची असेल तर कृषी क्षेत्राशिवाय पर्याय नाही. कारण आपण कितीही विज्ञानवादी जगात वावरत असलो तरी आपली भूक शमविण्यासाठी आपल्याला अन्नाची गरज लागते आणि आपल्याला जगण्यासाठी पुरेसा आहार शेतीतूनच मिळतो. इंटरनेटच्या जगात भाकरी डाऊनलोड करता येत नाही, हे वैश्विक सत्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण महिला प्रदेशाध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी तालुक्यातील सावरवाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे अर्चना घारे – परब यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय किर्लोस- आरोस यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सावरवाड येथे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचे उद्घाटन प्रसंगी अर्चना घारे – परब मार्गदर्शन करत होत्या.
यावेळी सावरवाड सरपंच देवयानी पवार, उपसरपंच अनिकेत म्हाडगुत, पूजा निकम, सुप्रिया मडगावकर, श्री. कुडतरकर, शाळेचे मुख्याध्यापिका सर्व शिक्षक व पालक वर्ग तसेच किर्लोस- आरोस कृषी विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी भरविण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन करत असताना अर्चना घारे पुढे म्हणाल्या, आपला भारत देश कृषीप्रधान देश असून आज आपल्याला विज्ञान युगातही कृषी क्षेत्राशिवाय तरणोपाय नाही. आज बहुसंख्य कुटुंब हे शेती या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून आहेत. आधुनिक युगातही युवकांनी शेतीची कास धरावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


